१० फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : सध्या हातउसने पैसे देणे देखील अनेकदा अडचणीचे ठरत असल्याचे दिसून येत आहे. केडगाव येथील एका युवकाने उसण्या पैशातून टोकाचे पाऊल उचलले असल्याची घटना ताजी असतानाच आता उसने दिलेल्या पैशाची मागणी करीत एकाने कापड व्यावसायिकास शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना ७ फेब्रुवारी रोजी जुने सिव्हिल हॉस्पिटल समोर गुरुनानक मार्केट येथे घडली.या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी की, किरण बालाजी डहाळे (रा. जुने सिव्हिल हॉस्पिटल समोर, गुरुनानक मार्केट, अ.नगर ) यांचा मुलगा कुणाल याने त्याचा मित्र बजरंग नारायण मिश्रा (रा. तुळजाभवानी मंदिरा मागे, पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर) यांच्याकडून तीन महिन्यापूर्वी तीन महिन्याच्या मुदतीवर ५० हजार रुपये उसने घेतले होते. त्या बदल्यात त्याच्याकडे सुझुकी कंपनीची ॲक्सेस मोपेड (क्र.एम एच १६ डी डी ९६५३) ठेवली होती.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-48.jpg)
७ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बजरंग मिश्रा हा डहाळे यांच्या घरी गेला व शिवीगाळ करीत त्यांच्या घराच्या दरवाजाला लाथा मारल्या. त्यावेळी किरण डहाळे यांनी तू उद्या दुकानावर येऊन कुणालची भेट घे, असे म्हटल्याचा मिश्रा यास राग आल्याने त्याने किरण डहाळे यांना शिवीगाळ करून, माझे पैसे मिळाले नाही तर मी तुम्हाला सोडणार नाही, जीवच ठार मारेल, अशी धमकी देऊन निघून गेला.याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी किरण डहाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बजरंग मिश्रा याच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद केली.