१४ फेब्रुवारी २०२५ पारनेर : गुरूवारी १३ फेब्रुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पारनेर शहरातील कन्हेर ओहोळ परिसरातुन एक घटना समोर आली आहे ज्यात एका जोडप्याची लूट करण्यात आली आहे. पारनेर- सुपे रस्त्याने दुचाकीवर एक जोडपं जात होते त्या जोडप्याला एका व्यक्तीने अडवले आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवले त्यानंतर त्यांच्याकडील चार लाख रुपये किंमतीची ४५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लुटून नेली.
या घटनेची मिळालेली सविस्तर माहिती अशी कि,पुणेवाडी येथील रहिवाशी बबुशा बाळू बोरूडे व पत्नी इंदूबाई हे टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी दशक्रिया विधीसाठी गेले होते.दशक्रिया विधी झाल्यानंतर ते पारनेरमार्गे वडनेर हवेली येथे राहणाऱ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकीवर जात होते.

तेव्हा कन्हेर ओहोळ परिसरात मागून दोघेजण मोटार सायकलवर आले व त्या दोघांनी त्यांना थांबवले.त्यांनी जोडप्याला सांगितले कि ‘आम्ही पोलिस अधिकारी आहोत’ रात्री या ठिकाणी लुटण्याचा प्रकार झाला होता त्यामुळे तुमच्या जवळील मौल्यवान वस्तू जपून ठेवा,असे सांगत बबुशा बोरूडे यांच्या गळ्यातील पंचा घेऊन खिशातील पैसे, मोबाईल, डायरी पंचावर ठेवायला सांगितले.
त्यामुळे बोरूडे यांनी गळ्यातील पंचा काढल्यामुळे त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेनवर भामट्यांची नजर गेली.त्यांनी ती चेन पंचात ठेवायला भाग पाडले.त्यानंतर त्यांनी तो पंचा गुंडाळून त्याच्या पत्नी इंदूबाई यांच्या हवाली केला.मौल्यवान वस्तू सांभाळा, असे म्हणून ते दोन भामटे सुप्याच्या दिशेने निघून गेले.
वडनेर हवेलीच्या दिशेने काही अंतर पुढे गेल्यावर बोरूडे यांना संशय आला त्यामुळे त्यांनी पंचा घेऊन तपासल्यावर त्यात मोबाईल, डायरी, पैसे तसेच होते पण सोन्याची चेन मात्र चोरी झाल्याचे यांना समजले त्यामुळे त्यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठत त्याबद्दल तक्रार नोंदवली.