अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Ahmednagar Crime :- जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड झाल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने मयताचे घराचा परिसर, दुचाकीचा परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून कार्यवाही केली नाही.
त्यामुळेच पुरावे नष्ट झाले, असा बचाव आरोपींच्या वकिलांनी केला. येथील प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्यासमोर जवखेडे हत्याकांड खटल्याची सुनावणी सुरू आहे.

आरोपींच्या वतीने विधिज्ञ सुनील मगरे, नितीन मोने, छगन गवई, सिद्धार्थ उबाळे, अरूण चांदणे हे काम पाहत आहेत. संजय, जयश्री आणि सुनील जाधव यांचे हत्याकांड झाल्यानंतर घटनास्थळ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून कार्यवाही केली नाही.
घटनास्थळ परिसरात सापडलेल्या दारूच्या बाटल्या, स्टील परातीवर कोणाचेही ठसे मिळाले नाहीत. हे पुरावे नष्ट होण्यास पोलीस प्रशासन जबाबदार आहेत, असा बचाव आरोपींच्या वकिलांनी केला.
हत्याकांडानंतर पाथर्डीचे तत्कालिन पोलीस निरीक्षक सुभाष अनमलवार यांच्याकडे 21 ते 23 ऑक्टोंबर 2014 या कालावधीत तपास होता. घटनास्थळ पंचनामा, मृतदेहांचा इक्वेस्ट पंचनामा, काठी, मयत संजय यांची राजदूत जप्त करण्यात तपासी अधिकारी होते.
अनमलवार यांनी सरतपासणीमध्ये गुन्ह्याचा प्रारंभी तपास केल्याचे मान्य केले आहे. उलट तपासणीमध्ये घटनास्थळ सील करणे आवश्यक होते. मयत जाधव यांचे घर, मृतदेह आढळून आलेल्या विहिरी,
कुपनलिका सील केली नसल्याचे मान्य केले. या ठिकाणी पोलिसांव्यतिरिक्त इतर ही लोकांचा वावर होता. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच पुरावे नष्ट झाल्याचा आरोप आरोपींच्या वकिलांनी केला आहे.