पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील एका विवाहित महिलेने रविवार (दि.२८) जुलै रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी तीन जणांवर पाथर्डी पोलिसांत सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास अटक करण्यात आली आहे.
या घटनेबाबत काकासाहेब नामदेव जराड (रा. शेडे चांदगाव, ता. शेवगाव), यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तुझ्या – वडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही, त्यामुळे वडिलांकडून एक लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत मयत वैष्णवी महेश भावले हीस शिवीगाळ करत लाथ्याबुक्क्यांनी मारहाण करत आत्महत्येस प्रवृत्त केले.
या फिर्यादीवरून मयत विवाहितेचा पती महेश बाबासाहेब भावले, सासु मंदा बाबासाहेब भावले (रा. करंजी) व नातेवाईक राजू नाथा वीर (रा. बोधेगाव) या तिघांविरोधात पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सात महिन्यापूर्वीच वैष्णवी आणि महेश भावले यांचा विवाह पार पडला होता. त्यानंतर काही दिवसांतच आर्थिक देवाण- घेवाणीवरून झालेला वाद आणि त्या वादातून या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी मोठा रोष व्यक्त करत सोमवारी अंत्यविधीप्रसंगी सासरच्या काही व्यक्तींना मारहाण केली, त्यामुळे काही वेळ या ठिकाणी वातावरण तणावपूर्ण बनले होते.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक जगदीश मुलगीर, रणदिवे तांबे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त होता. करंजी गावचे सरपंच रफिक शेख, माजी सरपंच शिवाजी भाकरे, रावसाहेब भाकरे यांच्यासह गावातील प्रमुख व्यक्तींनी संबंधित नातेवाईकांची समजूत काढत दुःखद अंतकरणाने मयत शुभांगी भावले हिच्यावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी मयत वैष्णवीचा पती महेश भावले यास पोलिसांनी अटक केली आहे.