निषेध ग्रामसभेनंतर २४ तासांच्या आत प्राध्यापकावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला : शिर्डी येथील घटना

Sushant Kulkarni
Published:

१२ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : देशातील तसेच विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी आता भलत्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. शिर्डी शहरात नुकत्याच झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निषेध ग्रामसभेला २४ तास पूर्ण होत नाही तोच ३२ वर्षीय प्राध्यापकावर पाच ते सहा गुंडांनी धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना शिर्डी शहरात घडली आहे.

याबाबत माहिती अशी की, शिर्डी शहरातील कनकुरी रोड लगत असलेल्या श्रीराम नगर भागातील रहिवासी असलेले सादिक शौकत शेख (वय ३२) हे नेहमी प्रमाणे ड्युटी करून सायंकाळी आपल्या आईला मस्जिद शेजारी भाजीपाला आणि किराणा दुकानांमध्ये मदत करत असतांना अचानक पाच ते सहा गुंडाच्या टोळीने सादिक यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले अन पसार झाले आहे.

या हल्ल्यात त्यांच्या पोटावर दोन तर डोक्यावर एक असे एकूण तीन वार करण्यात आले आहे. घटनेनंतर त्यांना उपचारासाठी श्री साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनेची माहिती समजतात शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शिर्डी शहरात आठ दिवसापूर्वी दोघा आरोपींनी साई संस्थानच्या दोन कर्मचारी यांची निर्घुण हत्या केली होती. तर तर एक जण हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता.या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी शिर्डी ग्रामस्थानी निषेध ग्रामसभा घेऊन शहरातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन झाले नाही तर पोलीस ठाण्याला टाळी ठोकू असा इशारा देण्यात आला होता. ग्रामसभेला २४ तास उलटत नाही तोच पुन्हा एकदा पाच सहा गुंडांनी मिळून त्यांच्या दुकानावर धुमाकूळ घालत एकावर चाकुने हल्ला केला आहे. या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe