कामधंदा नसल्याने दारू पिण्यासाठी पैसे मिळात नाहीत. म्हणून दुचाकी चोरी करणाऱ्या एकास कोतवाली पोलिसांनी नगर शहरात चोरीच्या प्रयत्नात असताना रंगेहात पकडले.
त्याच्याकडून ५ लाख २५ हजार रुपये किमतीच्या १५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. गंगाराम बंडू कुऱ्हाडे (वय ३२ रा. टाकळी अंबड, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) असे या चोरांचे नाव आहे.
सोनसाखळी व दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींची माहिती काढण्यासाठी पोलिस पथक गस्त घालत असताना माळीवाडा परिसरातील इंपिरीयल चौक येथे रस्त्याच्या कडेला एक संशयित तेथे पार्क केलेल्या वाहनाच्या आसपास संशयितरित्या फिरताना आढळून आला.
त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता, सध्या मी काही एक कामधंदा करत नसल्याने मला दारू पिण्याकरीता व फिरायला पैशाची आवश्यकता असल्याने नगर शहरातून दुचाकी चोरी केल्या आहेत, असे या चोराने सांगितले.
दुचाकी मी काही दिवस वापरून त्यातील पेट्रोल संपल्यावर त्या वेगवेगळ्या ठिकाणी लपवल्या आहेत. त्यांची विक्री करण्याकरीता मी ग्राहक शोधत आहे, असे त्याने चौकशीत सांगितले. अधिक तपास अंमलदार राजेंद्र औटी करत आहेत.