Ahmednagar Crime : कामाचे पैसे देऊन तुम्ही कामाला का नाही गेला, येथे काय करता? असे विचारल्याचा राग आल्याने आरोपी साहेबराव जाधव याने अशोक दिवे यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना दि. १८ मार्च रोजी राहुरी तालूक्यातील कणगर येथे घडली.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की अशोक मच्छिद्र दिवे (वय ३५ वर्षे, रा. कणगर, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्यांच्यासह चार लोकांनी मिळून कोल्हापूर येथे विहीर बांधण्याचे काम घेतले होते. ठेकेदाराकडुन काही रक्कम उचल घेऊन दिवे यांनी इतर कामगारांना दिली.
त्यानंतर साहेबराव जाधव व इतर दोन लोकांना कामासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले. आणखी इतर कामगार जमा करण्यासाठी अशोक दिवे व बाळासाहेब पुंजाराम उबाळे कणगर येथे थांबले होते. दि. १८ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजाच्या सुमारास अशोक दिवे व बाळासाहेब उबाळे हे कणगर गावातील बुबळेश्वर चौक येथून जात असताना साहेबराव जाधव हा तेथे थांबलेला दिसला.
तेव्हा अशोक दिवे यांनी त्याच्या जवळ जाऊन त्यास विचारले की, तुम्हाला विहीर बांधण्याचे कामासाठी पैसे देऊन कोल्हापूरला पाठविले होते. तुम्ही काम सोडून परत का आले ? असे विचारल्याचा त्याला राग आल्याने त्याने अशोक दिवे यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच लाकडी दांड्याने मारहाण केली. नंतर तुला काय करायचे ते कर, तु जर मला परत विचारले तर तुझा बेतच पाहतो, अशी धमकी दिली.
या घटनेत अशोक मच्छिद्र दिवे हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशोक मच्छिद्र दिवे यांच्या फिर्यादीवरून आरोपी साहेबराव जाधव (रा. कणगर, ता. राहुरी) याच्या विरुद्ध गुन्हा रजि. नं. २८३/२०२४ नुसार भा.दं. वि. कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.