मुलीचे मोबाईलद्वारे छायाचित्रण ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

१२ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : घरासमोरील स्नानगृहात अंघोळ करीत असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे एका तरुणाने मोबाईलमध्ये छायाचित्रण केल्याची घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील एका परिसरात घडली. याप्रकरणी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याबाबत येथील तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका परिसरात राहणारी इयत्ता दहावीत शिकणारी अल्पवयीन मुलगी सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत फ्लेक्सचे कापड आणि बांबूचा वापर करुन आडोसा उभारलेल्या स्नानगृहात अंघोळीला गेली.

यावेळी या मुलीच्या घराजवळच राहणारा आरोपी तरुण तिच्याकडे निरखून बघत होता.त्याने उघड्या छताच्या स्नानगृहात अंघोळ करणाऱ्या या मुलीचे मोबाईमधून छायाचित्रण केले.हा प्रकार लक्षात येताच पीडित मुलीने आरडाओरड करीत आपल्या आईला बोलावले. मुलीचा आवाज ऐकून तिची आई स्नानगृहाजवळ आली. त्यानंतर त्या तरुणाने पळ काढला.

तिच्या पालकांनी या तरुणाच्या घरी जावून असे कृत्य का केले ? असा जाब विचारला असता, त्याने उद्धटपणे उत्तरे दिली.त्यामुळे संतापलेल्या मुलीच्या पालकांनी तालुका पोलीस ठाण्यात जाऊन या तरुणाविरुद्ध फिर्याद दिली.त्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सोसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर हिंदूत्वत्वादी संघटनांच्या कार्यकत्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र आरोपीला अटक झाल्यानंतर तणाव निवळला होता.