अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- गस्तीवर असलेल्या पोलिसांना एका वाहनाचा संशय आल्याने त्यांनी गाडीचा पाठलाग करून त्या वाहनाची झडती घेतली असता तब्बल दीड लाख रुपयांचे दारू बनवण्यासाठी उपयोगात येणारे रसायन आढळुन आले आहे.
पोलिसांनी हे रसायन व एकजण ताब्यात घेतला आहे. ही कारवाई संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारात केली. याबाबत सविस्तर माहिती अशी,
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारात गस्तीवरअसलेल्या पोलिसांना एका वाहनाचा संशय आल्याने त्यांनी गाडीचा पाठलाग केला. पोलिसांची गाडी पाहून गाडीतील एक जण पळून गेला.
यावेळी पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये ३० ते ३२ कॅन आढळले. त्यामुळे गाडीतील व्यक्तीला ताब्यात घेत चौकशी केली असता दारु बनवण्यासाठी उपयोगात येणारे स्पिरीट असल्याची माहिती मिळाली.
त्यामुळे पोलिसांनी हा मुद्देमाल आश्वी पोलीस ठाणे येथे आणला व राज्य उत्पादन शुल्क संगमनेर यांना याबाबत माहिती कळवली.
त्यानुसार या रसायनाचे २८ कॅन, १ लाख रुपये किमतीचे वाहन तसेच इतर असे १ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात संकेत अनिल कुऱ्हाडे (रा. गोधवणी, ता. श्रीरामपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम