Ahmednagar Crime : स्वस्तात सोने देण्याचे अमिष दाखवून व्यापाऱ्यास लुटणारा आरोपी जेरबंद करण्यात आला आहे. नकुल उर्फ कारभारी अरुण भोसले (वय २५, रा. टाकमुकवाडी, ता. परांडा, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
पुणे जिल्ह्यातील कात्रज येथील संतोष नगर येथील व्यावसायीक रघुनाथ ऋषिकेश शिंदे (वय ४८) यांना स्वस्तात सोने देण्याचे अमिष दाखवून जामखेड तालुक्यातील राजुरी शिवारात बोलविण्यात आले होते.
यावेळी सहा जणांनी शिंदे यांना लाठी-काठ्याने मारहाण करत त्यांच्याकडील १० लाख ११ हजार रुपयांची रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात भादविकच्या ३९५, १२० (ब), ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरील गुन्ह्याचा तपास एलसीबीच्या पथकाने वेगाने फिरविला. नकुल भोसले याला नान्नज शिवारात जेरबंद केले. त्याने इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबुल केले. नकुल उर्फ कारभारी अरुण भोसले यास जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर, सपोनि. हेमंत थोरात, पोहेकॉ. विश्वास बेरड,
पोना. रविंद्र कर्डिले, भिमराज खसें, विशाल दळवी, फुरकान शेख, पोकॉ. अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, सागर ससाणे, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे, अरुण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.