पाथर्डीतील कुंटणखान्यावर छापा, तीन महिलांची सुटका

Karuna Gaikwad
Published:

११ फेब्रुवारी २०२५ पाथर्डी : शहरालगत असणाऱ्या नगर रोडवरील ‘हॉटेल मित्रधन’ मध्ये सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर पाथर्डी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा घालून तीन महिलांची सुटका केली.याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात हॉटेल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकाला ताब्यात घेतले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथक पाथर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्याची माहिती घेत असताना, पाथर्डी ते तिसगाव रस्त्यावरील ‘हॉटेल मित्रधन’ येथे एक व्यक्ती महिलाकरवी वेश्या व्यवसाय (कुंटणखाना) चालवत असल्याची माहिती मिळाली.

पथकाने ही माहिती पाथर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांना दिली. त्यानुसार, संयुक्त पथकाने ‘हॉटेल मित्रधन’ येथे पथकातील पोलिस अंमलदारास बनावट ग्राहक म्हणून पाठवले.तपास पथकाने नमूद हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालू असल्याची खात्री पटल्यानंतर शासकीय पंचासमक्ष हॉटेलवर छापा घातला.

मल्हारी रघुनाथ पालवे (वय २८, रा. कसबा पेठ, पाथर्डी) याला हॉटेलमध्ये पकडले.त्याच्याकडून मोबाईल व रोख रक्कम असा २१ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील रूममध्ये तीन महिला आढळून आल्या.त्यांची सुटका करण्यात आली.आमच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे या महिलांनी सांगितले.

पोलिस कॉन्स्टेबल सारिका दरेकर यांच्या फिर्यादीनुसार हॉटेल चालक मल्हारी रघुनाथ पालवे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाथर्डी पोलिस करीत आहेत. दरम्यान, शहरानजीक व राष्ट्रीय महामार्गावरील अनेक हॉटेल, बारमध्ये अनैतिक धंदे चालू असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून नागरिकांमध्ये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe