२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : २० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : सध्या जिल्ह्यात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे.यात शहरात दिवसा महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबडले जात आहेत.तर बंद असलेली घरे फोडली जात आहेत.पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागात तर भरदिवसा घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीमुळे नागरिक व पोलिस देखील त्रस्त झाले आहेत.
तीन दिवसांत पाच ठिकाणी चोरीच्या घटना घडलेल्या आहेत.माळेगाव येथील दोन,सांगवी येथील एक,पागोरी पिंपळगाव व शहरातील कसबा पेठ येथे अशा पाच ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत.यामध्ये लाखो रुपयांचे सोन्या, चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली आहे.

चार दिवसांपूर्वी शाहुराव फरताळे यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली.तेथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन चोरटे कैद झाले आहेत.त्यानंतर माळेगाव येथील तुकाराम एकशिंगे यांच्या घराचे कुलूप तोडून दागिने लंपास केले.
सांगवी येथील धाकतोडे यांच्या घराचे कुलूप तोडून सुमारे एक लाख रुपयाचा ऐवज चोरुन नेला आहे.त्यानंतर पागोरी पिंपळगाव येथे चोरीचा प्रयत्न झाला. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास व्दारकाबाई उत्तमराव उबाळे यांच्या घराचे कुलूप अनोळखी इसमांनी तोडून घरातील लोखंडी पेटीत असलेले ९० हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने, असा एक लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे.
भास्कर उबाळे यांनी याबाबत चोरीची फिर्याद दाखल केली आहे.उबाळे यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली.ठसे तज्ञ व श्वानपथकाने घटना स्थळाला भेट दिली आहे.दरम्यान, चोरट्यांचा एक वापरता पंचा, पाठीवरील सॅक, त्यामध्ये हातमोजा व लोखंडी कटावणी, असे साहित्य पोलिसांना मिळाले आहे.