वाळू तस्करांकडून महसूलच्या पथकावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

Sushant Kulkarni
Published:

१२ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : वाळू तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या महसूल खात्याच्या पथकातील कर्मचाऱ्यांवर जेसीबी घालून पथकातील कर्मचाऱ्यांना ठार करण्याचा प्रयत्न झाला.सोमवारी मध्यरात्री तालुक्यातील अंभोरे परिसरात ही घटना घडली.याप्रकरणी पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यातील तिघांना अटक केली आहे.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील कनोली शिवारातील प्रवरा नदी पात्रामधून अनाधिकृतरित्या वाळू उपसा होत असल्याची गुप्त माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांना समजली.तहसीलदार तत्काळ स्वतः विशेष पथकासह मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास कारवाई करण्यासाठी कनोली गावाकडे निघाले.कणोली शिवारातील प्रवरा नदी पात्राच्या शेजारी एक जेसीबी उभा असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. महसूलचे पथक आले असल्याचे जेसीबी चालक सोनू मोरे याने पाहिले.

अंधाराचा फायदा घेऊन त्याने जेसीबीसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. महसूलच्या पथकाने त्याचा पाठलाग केला. अंभोरे शिवारातील सावळेराम लहानू खेमनर, तुषार हौशीराम खेमनर, विशाल हौशीराम खेमनर, सागर जगताप लखन उर्फ दिपक मदने, विशाल आबाजी खेमनर, प्रवीण शिवाजी गवारी, फिरोज शेख व ताहीर शेख (सर्व राहणार अंभोरे) यांनी जमाव गोळा करून सरकारी कामात अडथळा आणला.

आमच्यावर कारवाई केली तर तुमचे हातपाय तोडू व येथेच जिवंत मारुन टाकू, अशी धमकी वाळू तस्करांनी पथकातील कर्मचाऱ्यांना दिली. सोनू मोरे याने महसूलच्या विशेष पथकावरच जेसीबी घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कनोलीचे कामगार तलाठी संतोष शेलार यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून पोलिसांनी दहा जणांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणणे जेसीबी अंगावर घालणे आणि पर्यावरण कायद्याचा ऱ्हास या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.त्यातील तुषार हौशीराम खेमनर याच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe