Ahmednagar Crime News : चोरीचे सोने घेतल्याचे सांगत महिला पोलिसाने सराफाला 32 हजारांत गंडवले !

Published on -

Ahmednagar Crime News : चोरीचे सोने घेतल्याचा आरोप करून एका तोतया महिला पोलिस अधिकाऱ्याने नगरच्या सराफ व्यावसायिकाची ३२ हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

गणेश विजय साळी (वय ४२ रा. रंगार गल्ली, आनंदी बाजार, नगर) असे फसवणूक झालेल्या सराफ व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी रविवारी दिलेल्या फिर्यादीवरून एक मोबाईल नंबर धारक व अमिनुद्दीन खान (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही, दोघे रा. उज्जैन महाकाल, मध्य प्रदेश) यांच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साळी यांचे रंगार गल्ली येथे मंगलमुर्ती ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. ते शनिवारी सायंकाळी सात वाजता दुकानात असताना एक अनोळखी नंबरवरून त्यांना फोन आला. टू-कॉलरवर रजणी सिंह असे नाव आले व एका महिलेच्या अंगावर पोलिस खात्याचे कपडे असल्याचा फोटो दिसला.

साळी यांनी फोन घेतला असता, ‘तुमच्या दुकानाचे बिल आरोपीकडे सापडले आहे. आरोपीने तुमच्या दुकानात चोरीचे सोन्याचे दागिने देऊन त्या बदल्यात दुसरा सोन्याचा दागिना केला व त्याची पाच ग्रॅमची रिकव्हरी निघत आहे’, अशी बतावणी केली.

साळी यांनी मी अशा प्रकारे कुठलाही माल घेतला नाही, असे सांगताच मी तुमच्यावर गुन्हा दाखल करीन, अटक करीन अशी धमकी दिली. त्यानंतर तिने साळी यांच्या व्हॉट्सअॅपला क्युआर कोड पाठविला व त्यावर ३२ हजार ४०० रुपये टाकण्यास सांगितले.

साळी यांनी पैसे पाठवले असता त्या महिलेने साळी यांना नंतर उडवाउडवीचे उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे साळी यांच्या लक्षात येताच त्यांनी फिर्याद दिली. सहाय्यक निरीक्षक नितीन रणदिवे तपास करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe