२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar news : पुणे येथून दोघेजण छत्तीसगड येथे मोटारसायकलवरून जात असताना देवगड फाटा येथे थांबले.मात्र यावेळी अज्ञात आरोपींनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील मोटारसायकल व मोबाईल जबरीने चोरून नेला होता.
या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान नेवासा येथे दुचाकीस्वारास लुटणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतेच ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दोघांकडून चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत केला आहे.त्यानंतर त्यांना नेवासा पोलीस ठाण्यात मुद्देमालासह हजर केले असून पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, (दि. १३) जानेवारी रोजी दिड वाजेच्या सुमारास फिर्यादी मेघनाथकुमार विष्णु साहु (रा. बुंदेली, साहसपूर, जि. बेमेतरा, छत्तीसगड) हे पुणे येथून छत्तीसगड येथे मोटारसायकलवरून जात असताना देवगड फाटा येथे थांबलेले असताना अज्ञात आरोपींनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील मोटारसायकल व मोबाईल जबरीने चोरून नेला.
याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे.त्यानंतर पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील उघडकीस न आलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश दिले आहे.
त्यानुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकाला सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यामुळे पोलिसांनी मंगळवारी (दि. १८) तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करीत असताना हा गुन्हा दोन अल्पवयीन मुलांनी केल्याची माहिती मिळाली.
त्या अनुषंगाने पोलिसांनी दोन्ही विधीसंघर्षित मुलांचा शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडे विचारपूस केली असता,त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची माहिती दिली.