१९ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : सध्या जिल्ह्यातील तसेच राज्यातील साखर कारखाने जोरात सुरू आहेत. त्यामुळे ऊसतोड करणाऱ्या मजुरांची चांगलीच टंचाई निर्माण झाली आहे.त्यामुळे असे कामगार पुरवणाऱ्या मुकादमाना मोठ्या रकमा देऊन मजूर कामावर बोलवून घेतले जात आहेत. दरम्यान एका मुकादमास मारहाण करून त्याचे अपहरण केले तसेच त्याचा ट्रॅक्टर आणि दोन ट्रॉल्या पळवून नेल्या.
ही घटना दि.१६ फेब्रुवारी रोजी दुपारी राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे घडली.या प्रकरणी माळशिरस येथील ओंकार साखर कारखान्याच्या १० ते १५ कर्मचाऱ्यांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की संजय भास्कर भानवसे (वय ३८, रा. माढा, जि. सोलापूर) हे ऊस वाहतूक ठेकेदार आहेत.

त्यांनी त्यांचा भाऊ सुहास भानवसे यांच्या माध्यमातून ओंकार शुगर (चांदापुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या कारखान्यासोबत १० लाख रुपयांचे ऊसतोडणी व वाहतुकीचे करार केले होते; मात्र करारानुसार त्यांनी कारखान्यासाठी लेबर व ट्रॅक्टर पुरवले नाहीत.त्यामुळे त्यांनी उचल घेतलेले दोन लाख रुपये परत केले होते, तर उर्वरित रक्कम काही दिवसांत देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र दि.१६ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता माळशिरस येथील ओंकार साखर कारखान्याचे काही कर्मचारी तांभेरे (ता. राहुरी) येथे आले. त्यांनी संजय भानवसे यांचा ट्रॅक्टर आणि दोन ट्रेलर ताब्यात घेतले.त्याच वेळी त्यांच्या भावाला,बाबासाहेब भास्कर भानवसे यांना मारहाण करून जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन गेले.संजय भास्कर भानवसे यांच्या फिर्यादीवरून दहा ते पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.