१७ फेब्रुवारी २०२५ नवी मुंबई : शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या अलिबाग येथील शिक्षक वैभव नथुराम पिंगळे (५०) यांचा मृतदेह शनिवारी दुपारी सागरी सुरक्षा दलाच्या हाती लागला.अलिबाग येथील शिवाजीनगर कुडूस येथे राहणारे वैभव पिंगळे यांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अटल सेतूवरून अरबी समुद्रात उडी मारून आत्महत्या केली होती.
या घटनेची माहिती मिळताच उलवे पोलिसांसह सागरी सुरक्षा दलाने मच्छीमारांच्या मदतीने वैभव पिंगळे यांचा शोध सुरू केला होता.दरम्यान,नवी मुंबई पोलिसांच्या सागरी सुरक्षा पथकाने स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शुक्रवारी सायंकाळपर्यंत वैभव पिंगळे यांचा शोध घेतला. मात्र त्यांच्या हाती मृतदेह लागला नव्हता.शनिवारी दुपारी वैभव पिंगळे यांचा मृतदेह उलवे लगतच्या समुद्रात सापडला असून हा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शोध मोहिमेत आणखी एक मृतदेह सापडला
पिंगळे यांचा मृतदेह पोलीस शोध असताना अरबी समुद्रातील माणिक टोक न्हावा खाडीत निजामुद्दीन सय्यद या व्यक्तीचा मृतदेह हाती लागला.पोलिसांनी मृत निजामउद्दीन याचा फोटो आजूबाजूच्या पोलिसांना दाखवून त्याच्या मृतदेहाची ओळख पटवली असता, तो मानखुर्द येथील चिता कॅम्प ट्रॉम्बे येथे राहत असल्याचे तसेच त्याने १० फेब्रुवारी रोजी कर्जबाजारी पणाला कंटाळून वाशी खाडी पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले.याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात त्याच्या मिसिंगची नोंद असल्याची माहिती समोर आली.त्यानुसार उलवे पोलिसांनी निजामुद्दीन याच्या नातेवाईकांना संपर्क साधून त्यांचा मृतदेह ताब्यात दिला.