४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : पांढरीपुल येथे दुचाकी व पीकअप यांच्यात झालेल्या जोरदार अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन तरूणांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.दोन्ही मृत तरूण हे शेवगाव तालुक्यातील ढोरजळगांव येथील रहिवाशी होते.
प्रशांत शेषराव देशमुख (वय २४ वर्ष), शुभम बबन लांडे (वय २४ वर्षे) असे या मृत तरूणांची नावे आहेत.याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेवगाव तालुक्यातील ढोरजळगांव येथील प्रशांत देशमुख व शुभम लांडे हे दोघे दि.३१ डिसेंबरच्या रात्री अहिल्यानगर येथुन ढोरजळगांवकडे येत होते.
सायंकाळी ६ वाजता पांढरीपुल येथील वांबोरीकडे जाणाऱ्या चौकात मोटारसायकल व पीकअप यांचा अपघात झाला. या अपघातात प्रशांत शेषराव देशमुख याच्या चेहरा व छातीला जबर मार लागला तर शुभम बबन लांडे याच्या मेंदूला जबर मार लागल्याने त्यांना त्वरित अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरूवारी दि.२ जानेवारी रोजी उपचारादरम्यान प्रशांतचा सकाळी तर शुभमचा सायंकाळी मृत्यू झाला. प्रशांत हा मेडीकल व्यवसायिक तर शुभम हा पोलिस भरतीची तयारी करत होता, ढोरजळगांव येथील दोन तरूणांच्या अपघाती निधनानंतर गावावर शोककळा पसरली आहे.
प्रशांत याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा तर शुभमच्या पश्चात आई वडील व एक भाऊ असा परिवार आहे. या दोघांवर ढोरानदी तीरावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.दोघांच्या दु:खद निधनाने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.