४ फेब्रुवारी २०२५ अकोला : तंत्रविद्येने नोटांचा पाऊस पाडण्याचे स्वप्न दाखवून लूटणारी टोळी अकोला जिल्ह्यात अजूनही कायम आहे. यातूनच एकेकाळी अकोला शहरात समाजवादी पार्टीचे नेते मुकीम अहेमद यांची हत्या झाली होती. त्यानंतर पातूरच्या जंगलात रहेमत खान हामिद खान नामक व्यक्तीचा हकनाक बळी गेला.
नोटांचा पाऊस पाडून देणे किंवा भूमिगत धन काढून देण्याच्या नावाखाली आजवर अनेकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे.असे असले तरी अनेक सुशिक्षित लोक लोभास बळी पडतात.असाच काहीसा प्रकार पातूर तालुक्यातील सावरगाव येथे घडला. २३ जानेवारी २०२५ च्या रात्री काही लोक चारचाकी वाहनातून (क्रमांक एमएच ३७ जी ६४५४ ) सावरगावच्या जंगलात पोहोचले.नियोजितस्थळी पूर्वीच कथित विद्या जाणणारा भोंदू मांत्रिक उपस्थित होता.
प्रयोगासाठी महागड्या जडीबुटी, तांदूळ, पूजा साहित्य आणि पायाळूची आवश्यकतादेखील असल्याचे सागितले गेले.त्यामुळे अकोल्यातील जुळ्या बहिणींना भोंदू बाबानेच जंगलस्थळी पाचारण केले.गेल्या काही दिवसांपासून पातूरच्या जंगलात मोठ्या प्रमाणात गोवंशाची तस्करी होत असल्याने पोलीस आणि गावकरी रात्री-अपरात्री वावरणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवून होतेच.
दरम्यान, सावरगावच्या जंगलात चारचाकी वाहन शिरल्याने पाळत ठेवली गेली. कदाचित गोवंश चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून ही पाळत ठेवली गेली असावी.मात्र, घटनास्थळी काही वेगळेच होते. नोटांचा पाऊस पाडणाऱ्या मांत्रिकाचे प्रयोग सुरू होणार, इतक्यात गावकरी आणि इतर जमलेल्या लोकांनी प्रयोग करणाऱ्यावर हल्लाबोल केला.आकस्मिक हल्ल्यामुळे उपस्थितांची तारांबळ उडाली.
प्रयोगासाठी जमलेले वृद्ध मांत्रिक राजेश अवचार, डॉ. बाळा कालापार आणि इतरांनी तेथून पळ काढला.चारचाकी वाहन सुरू होत नसल्याने प्रयोगातील लोक सैरावरा धावू लागले.धावण्यात रहेमत खान हामिद खान याचे संतुलन गेले आणि खोल दरीत पडला.यातच त्याचा मृत्यू झाला.तो वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथील रहिवासी आहे.
दरम्यान, या घटनेचा भंडाफोड झाल्याने जंगलातून रहेमतचा मृतदेह शोधून काढण्यात आला.अकोला सर्वोपचारमध्ये शवविच्छेदन झाले.घटनास्थळावरून पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन (कार) जप्त करण्यात आले. आता याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
मृतकाच्या कुटुंबीयास मदत करण्याची मागणी पुढे आल्याने बारकाईने तपास सुरू आहे.बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली पातूरचे पोलीस निरीक्षक हनुमंत दोपेवाड आणि उपनिरीक्षक बंडू मेश्राम तपास करीत आहेत.