७ फेब्रुवारी २०२५ हातगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पहिलवान वस्तीवरील पहिलवान बाबा मंदिराचे सेवेकरी नामदेव रामा दहातोंडे (वय ७०) यांचा खून होऊन जवळपास १५ दिवसांचा कालावधी होत आला तरी या खून प्रकरणातील आरोपी सापडत नसल्याने हा तपास शासनाने एसआयटीकडे वर्ग करावा अन्यथा राज्यातील दलित समाजबांधव रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशारा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना अॅड. सदावर्ते म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात बोधेगाव येथे हा गंभीर प्रकार प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) घडला असून, सदर घटनेत मृत्यू झालेल्या दहातोंडे यांची शेवगाव पोलिसांत हरवल्याची नोंद दखल होऊन सुद्धा पोलिसांनी योग्यती दखल न घेतल्याने अखेर दहातोंडे यांच्या खुनाचा गुरुवार (दि. ३०) जानेवारी रोजी उलगडा झाला.
पहिलवान बाबा मंदिरालगतच असलेल्या एका विहिरीत दहातोंडे यांचे मुंडके सापडले तर दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. ३१ जानेवारी रोजी दुसऱ्या विहिरीत शरीराचे धड सापडले.एवढी क्रूर हत्त्या होऊनही पोलीस प्रशासन त्याची गांभीर्याने दखल घेत नसतील तर राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही,असा प्रश्न उभा रहात आहे, असे सांगून अॅड. सदावर्ते म्हणाले की, मयत दहातोंडे हे दलित समाजाचे असून, त्यांचे मारेकरी शोधण्यासाठी या खटल्याचा तसास एसआयटीकडे देण्यात यावा.
थोड्याच दिवसांत मी दहातोंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी त्यांचे नागलवाडी येथे येणार आहे.दरम्यान, मयत दहातोंडे यांचा मुलगा गौतम दहातोंडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव सुनील खंडागळे व तालुका उपाध्यक्ष गणेश बोरुडे यांनी नुकतीच मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन सदर घटनेकडे त्यांचे लक्ष वेधले आहे.