१७ फेब्रुवारी २०२५ : अहिल्यानगर : पिंपळगाव माळवी (ता. अहिल्यानगर) येथील आढाव वस्ती परिसरात एका ५० वर्षीय महिलेचा ! टणक हत्याराने खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान घडली. या घटनेला तीन दिवस उलटून गेले. मात्र, अद्यापही खुनाचे कारण समोर आलेले नाही.
पिंपळगाव माळवी शिवारातील आढाव वस्तीवर लताबाई नानाभाऊ कराळे (वय ५०) यांचा त्यांच्या राहत्या घरी गुरुवारी दुपारी खून झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला घटनास्थळी दाखल झाले.मृत महिलेचे पती नानाभाऊ कराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी तपास करत आहेत.तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही पिंपळगाव माळवी परिसरात शोध घेत आहे.पोलिसांनी आजूबाजूच्या वस्त्यांवर माहिती घेतली. मात्र, ठोस पुरावे मिळून आले नाहीत.महिलेचा खून झाला त्यावेळी कराळे यांच्या घरी कुणीही नव्हते.मृत महिलेचा पती व मुलगा कामानिमित्त गुरुवारी दिवस बाहेर होते.मृत महिला घरी एकटी असताना त्यांच्या घरी कुणी आले होते का, यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.