Ahmednagar Crime : राहुरी तालुका हद्दीत धूम स्टाईलने महिलांच्या अंगावरील दागिने पळविणाऱ्या श्रीरामपूर येथील दोघा जणांचा राहुरी पोलीस पथकाने शोध घेऊन सापळा लावून त्यांच्या मुसक्या आवळल्या.
सुमती संजय दिघे, वय ५३ वर्षे, या महात्मा फुले कृषी विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक म्हणुन नोकरी करतात. त्या राहुरी खुर्द येथील राजेश्वरी कॉलनी येथे रहावयास आहेत. दि. २१ मार्च २०२४ रोजी दुपारी ३.४५ वाजे दरम्यान सुमती दिघे व त्यांचे पती संजय दिघे हे दोघे मोटारसायकलवर राहुरी खुर्द येथून विद्यापीठकडे जात होते.
विद्यापीठ येथील पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून मोटरसायकलवर आलेल्या दोन भामट्या पैकी मागे बसलेल्या भामट्याने सुमती दिघे यांच्या गळयातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावुन नगरच्या दिशेने धूम ठोकली होती. तेव्हा सुमती संजय दिघे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात रस्तालूटीचा गुन्हा दाखल केला होता.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील हे करत होते. त्यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे,
पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, अशोक शिंदे, पोलीस नाईक गणेश सानप, गणेश लिपणे, संतोष राठोड, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, महिला पोलीस नाईक वृषाली कुसळकर,
चालक उत्तरेश्वर मोराळे आदी पोलीस पथकाने सापळा लावला. आरोपी अर्जुन हिरामण गोर्डे व महेश दत्तात्रय गवारे, दोघे रा. अशोकनगर, तालुका श्रीरामपूर यांच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले.
आरोपीने चोरलेल्या दोन तोळे सोन्याचे मिनी गंठण विकून आलेल्या पैशातील ४ हजार ५०० रुपये पोलिसां कडून जप्त करण्यात आले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील करीत आहे.