Ahmednagar Crime : अहमदनगर शहराच्या सावेडी भागातील कार्यकारी अभियंत्यांचा बंद असलेला बंगला अज्ञात चोरट्यांनी फोडून बंगल्यातील कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना रविवारी (दि. १५) सकाळी उघडकीस आली आहे.
याबाबत रमेश बाबुराव गुंड (वय ५६, रा. तांबटकर मळा, सावेडी ) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गुंड हे लातूर येथील एमआयडीसी येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत.
त्यामुळे ते कुटुंबासह लातूरला राहतात. सुटीच्या वेळी ते नगरला येत असतात. त्यांच्या नगरमधील बंगल्याला कुलूप असते. शुक्रवारी (दि. १३) सकाळी ९ ते रविवारी (दि. १५) सकाळी ९ या कालावधीत त्यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून बंगल्यात प्रवेश केला.
बंगल्यातील बेडरूममधील कपाटाचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा ३० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
रविवारी सकाळी गुंड हे घरी आल्यावर त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी ही घटना पोलिसांना कळविली. तसेच तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.