‘या’ तरुणांनी बसवले वाहतुकीचे नियम धाब्यावर ; धूमस्टाईलला आवर घालणार कोण ?

२७ जानेवारी २०२५ सुपा : अलिकडील काळात शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही चारचाकी व दुचाकींचे प्रमाण वाढत आहे.एक माणूस एक गाडी व एक मोबाईल हे समिकरण झाले आहे.त्यातच आजच्या तरुणांमध्ये धूमस्टाईलने गाडी चालविण्याची क्रेझ निर्माण झाली असल्याने अपघातांत जखमी व मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर वाहन चालविण्याचा परवाना मिळत असला तरी, आज अनेक मार्गावर अल्पवयीन मुले वाहन चालवताना दिसतात.विशेष म्हणजे अनेक पालक आपल्या अल्पवयीन पाल्याला गाडी चालवायला देतात.आज ग्रामीण भागातील अंतर्गत मार्गावर अनेक अल्पवयीन मुले वेगाने धूमस्टाईलने वाहन चालवताना आढळतात.

त्यांना पोलिसांची भीती नसते, त्यामुळे अनेकदा अंतर्गत मार्गावर अपघात होतात ग्रामीण भागात अपघात होण्याची अनेक कारणे आहेत त्यात रस्त्याची अर्धवट कामे, खराब रस्ते, रस्त्यावर असलेली गुरेढोरे, मोकाट जनावरे, अरुंद रस्ते, अचानक रस्ता ओलांडणारे नागरिक, मोठ्या वाहनांना धोकादायक ठिकाणी ओव्हरटेक करणे, मद्य प्राशन करून वाहन चालवणे, हेल्मेटचा वापर न करणे, सर्वात महत्वाचे म्हणजे वाहतुकीचे नियम न पाळणे, यामुळे काही वर्षात ग्रामीण भागात अपघातांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.

धूमस्टाईलला आवर कोण घालणार,असा प्रश्न सर्वांसमोर आहे.शहरात वाहतुकीचे नियंत्रण करणारे पोलिस असल्याने तिथे बऱ्याच प्रमाणात वाहतुकीचे नियम पाळावे लागतात व पाळले जातात.मात्र, ग्रामीण भागात तशी प्रभावी यंत्रणा नसल्यामुळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविले जातात.

आज ग्रामीण भागात अल्पवयीन तरुण तालुक्याच्या ठिकाणी किंवा महामार्गावरून प्रवास करताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. शिकवणी वर्गाला जाताना मुले-मुली सायकलऐवजी दुचाकी धूमस्टाईलने चालवतात,त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अशा अल्पवयीन मुलांना गाडी देणाऱ्या पालकांवर किंवा गाडी मालकांवर कारवाई करणे अपेक्षित आहे तरच यावर नियंत्रण प्रस्थापित होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe