२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar news : साईबाबांच्या दर्शनासाठी येत असलेल्या गुजरात राज्यातील भाविकांना अडवून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या श्रीरामपूरच्या टोळीस पोलीसांनी जेरबंद केले आहे.त्यांच्याकडून ३ मोबाईल, एअरगन,लोखंडी हत्यार,एअर गण छर्रा, इंडिका कार असा मुद्धेमाल जप्त करण्यात आला आहे.
शिर्डीला साई दर्शनासाठी कारने येणाऱ्या गुजरातच्या भाविकांना कोपरगाव तालुक्यातील कारवाडी शिवारात सकाळीच अज्ञात आरोपींनी बंदुक व कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून सोन्याचे दागीने व मोबाईल असा मुद्देमाल जबरीने चोरून नेला.याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान या भामट्यांनी सर्व प्रकारची रोख रक्कम आपसामध्ये वाटून घेतली असून सोन्या चांदीचे दागिने हे नाशिक येथील राजेंद्र बंधू यांना विकले.त्यातून आलेली रक्कम देखील एकमेकांत वाटून घेतली.त्यानंतर परत एकदा ही टोळी पांढऱ्या रंगाच्या इंडिका कार मधून लासलगाव मार्गे शिर्डीकडे निघाली मात्र पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी यापूर्वीच त्यांच्या मार्गावर पथक रवाना केले होते.
दरम्यान या पथकाला ही टोळी परत एकदा शिर्डी परिसरात येत असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार पोलिस पथकाने शिर्डी येथील कारवाडी फाट्याजवळ सापळा रचून विजय गणपत जाधव, (वय २९, रा.गोंधवणी रोड, वॉर्ड नं.१. श्रीरामपूर, अहिल्यानगर), सिध्दार्थ भाऊसाहेब कदम (वय २९), राहुल संजय शिंगाडे (वय ३५), सागर दिनकर भालेराव(वय ३०), समीर रामदास माळी (वय २६), दोन विधी संघर्षित बालक (सर्व रा. पोहेगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले.
३ मोबाईल, एअरगन,लोखंडी हत्यार,एअर गण छर्रा, इंडिका कार असा एकुण ९ लाख ५४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी गुजरातच्या साई भक्तांना लुटल्याचा गुन्हा कबूल केला.अधिक तपास केला असता आरोपींनी संगमनेर, घोटी, वैजापूर या ठिकाणी दरोडा व जबरी चोरीचे चार गुन्हे केले असल्याचे सांगितले.