१ जानेवारी २०२५ राहुरी शहर : आठ दिवसांपूर्वी राहुरीतील शिवाजी चौक परिसरात भरदिवसा राजेश गारमेंट या दुकानात चोरीची घटना घडली होती. चोरट्याने ७५ हजार रुपयांचे रेडीमेड कपड्यांचे बॉक्स उचलून थेट समोर उभ्या असलेल्या रिक्षात टाकले आणि पसार झाला.विशेष म्हणजे, चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असूनही,आठ दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाला चोरट्याचा शोध घेता आलेला नाही.
या संदर्भात राहुरी शहर व्यापारी असोसिएशनने आज, ३१ डिसेंबर २०२४ रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी पोलिसांना स्पष्टपणे सांगितले की, चोरट्याचा तात्काळ शोध लावला गेला नाही, तर व्यापाऱ्यांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.दि. २४ डिसेंबर रोजी सकाळच्या वेळी सुधीर नागपाल यांच्या राजेश गारमेंट या दुकानाबाहेर ७५ हजार रुपयांचे रेडीमेड कपड्यांचे बॉक्स ठेवण्यात आले होते.अज्ञात चोरट्याने तो बॉक्स उचलून समोर उभ्या असलेल्या रिक्षात टाकून पळ काढला.
ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरटा चोरी करताना स्पष्टपणे दिसत असूनही, पोलीस अद्याप काहीच कारवाई करू शकलेले नाहीत.या निवेदनावर व्यापारी संघटनेच्या सचिव अनिल भट्टड, अध्यक्ष प्रकाश पारख, उपाध्यक्ष अनिल कासार, माजी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भूजाडी, तसेच कांता तनपूरे, राजेंद्र दरक, संतोष लोढा, संजीव उदावंत, सुधीर नागपाल, आणि इतर २५ हून अधिक व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत.
पोलीस प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून चोराला अटक करावी आणि व्यापाऱ्यांना सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी सर्व व्यापाऱ्यांनी केली आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे व्यापाऱ्यांमधील असंतोष वाढत असून, परिस्थिती अधिक गंभीर होण्याआधी योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे.
व्यापारी संघटनेचा इशारा
चोराचा तात्काळ शोध न लावल्यास व्यापारी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील,असा इशारा व्यापारी असोसिएशनने पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.
पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह
चोरीच्या घटनेला आठवडा उलटला असूनही तपासातील विलंबामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे राहुरी शहरातील व्यापाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली असल्याचे स्पष्ट होत आहे.अशा घटनांमुळे व्यापाऱ्यांच्या मनात पोलिसांप्रती विश्वास कमी होत चालला आहे.