१४ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : नगर जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.१८ जून २०२२ रोजी दुपारी पीडित मुलगी घरासमोर खेळत होती तेव्हा आरोपी तिच्या जवळ आला आणि त्याने तिला घराजवळ असलेल्या नारळाजवळील बांधाजवळ नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिच्या कपड्यांनी गळा आवळून तिला मारायचा प्रयत्न केला.
केशा उर्फ किशोर विजय पवार (वय २७, रा. आरडगाव, ता. राहुरी) असे या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात अत्याचार आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीला विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी मोरे यांनी २० वर्षांची सक्तमजुरीची आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.या केसच्या सरकारी वकील म्हणून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वैशाली राहुल राऊत यांनी काम पाहिले.

या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सज्जनकुमार नरेडा व डीवायएसपी संदीप मिटके यांनी केला आणि न्यायालयात आरोपींविरूध्द दोषारोप पत्र सादर केले.खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे १७ साक्षीदार तपासण्यात आले असून यामध्ये अल्पवयीन पीडित मुलगी, पीडित मुलीची आई, बहीण, पंच साक्षीदार, तपासी अधिकाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरली.पीडित मुलीची साक्ष, सरकारी वकीलांचा युक्तीवाद व संपूर्ण पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली.