Ahmednagar Crime News : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे मुक्कामी असलेल्या एसटी बसमधून पहाटेच्या दरम्यान बसच्या चालक व वाहकाने डिझेल चोरी करत असताना दोन भामट्यांना रंगेहाथ पकडले. एक भामटा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. तर एका भामट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सुखदेव नाथु ढाकणे (वय ५५ वर्षे) एसटी महामंडळात शेवगाव डेपो येथे बस चालक म्हणून नोकरी करतात. दि. २९ नोव्हेंबर २०२३ रोजी सुखदेव ढाकणे व बसचे वाहक रामदास देवराम ज-हाड हे शेवगाव आगाराची एस.टी. बस क्रमांक एम.एच.१४ बी.टी. ४३८६ या बसमध्ये शेवगाव ते राहुरी प्रवासी बसवून निघाले होते.
त्यानंतर राहुरी येथे येवून वांबोरी मुक्कामासाठी वांबोरी बसस्थानक येथे गेले. चालक व वाहक जेवन करून गाडीमध्ये झोपी गेले. त्यानंतर दि. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे ३ वा. चे सुमारास गाडीच्या डिझेल टाकीजवळ काहितरी आवाज आल्याने
चालक व वाहक यांनी गाडीच्या खाली उतरून पाहिले असता दोघेजण गाडीच्या डिझेल टाकीमधुन पाईपने डिझेल काढताना दिसले.
त्यावेळी एक भामटा अंधाराचा फायदा घेऊन स्कुटी गाडीवर पळून गेला. तेव्हा चालक व वाहक यांनी एका भामट्याला जागीच पकडले. त्यावेळी त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सचिन उर्फ बाळु राजेंद्र वाघमारे रा. वांबोरी ता. राहुरी, असे सांगितले.
घटनेची माहिती मिळताच वांबोरी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक पालवे हे तेथे आले. त्यांनी भामट्याला ताब्यात घेऊन पळून गेलेल्या इसमाची चौकशी केली. त्याने त्याचे नाव संजय चंद्रकांत वेताळ रा. वांबोरी ता. राहुरी असे असल्याचे सांगितले.
बस चालक सुखदेव नाथु ढाकणे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात सचिन उर्फ बाळु राजेंद्र वाघमारे, वय २७ वर्षे, व संजय चंद्रकांत वेताळ, दोघे रा. वांबोरी, ता. राहुरी. या दोघांवर गुन्हा रजि. नं. १३१९/२०२३ भादंवि कलम ३७९, ५११, ३४ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.