अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2022 :- सहा गावठी कट्टे व 12 जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेवुन आलेल्या संगमनेरच्या दोन तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोल्हार (ता. राहाता) येथून ताब्यात घेत अटक केली.
ऋषिकेश बाळासाहेब घारे (वय 21 रा. पारेगाव बु. ता. संगमनेर), समाधान बाळासाहेब सांगळे (वय 27 रा. चिंचोली गुरव ता. संगमनेर) अशी पकडलेल्या तरूणांची नावे आहेत.
त्यांच्याविरूध्द लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी पत्रपरिषदेत दिली.
कोल्हार येथील नगर-मनमाड रोडवर हॉटेल जनता जवळ ऋषिकेश घारे व त्याचा साथीदार गावठी कट्टे विक्रीसाठी घेवुन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.
त्यांंनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने कोल्हार येथील नगर-मनमाड रोडवर हॉटेल जनता जवळ सापळा लावला.
दोन तरूण पायी येताना दिसताच त्यांना पथकाने पकडले. त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता ऋषिकेश घारेच्या कंबरेला पँटचे बेल्टमध्ये खोसलेला एक गावठी कट्टा पोलिसांना मिळून आला.
समाधान सांगळे याच्या पाठीवर असलेल्या काळे रंगाच्या पिशवीची (सॅक) पोलिसांनी झडती घेतली असता त्यामध्ये पाच गावठी कट्टे व 12 जिवंत काडतुसे मिळून आली.
पोलिसांनी सर्व कट्टे, काडतुसे जप्त करत दोघांना अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी सांगळेविरूध्द संगमनेर शहर, संगमनेर तालुका, शिर्डी पोलीस ठाण्यात दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, दुखापत करणे आदी स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम