अहमदनगरमध्ये निवडणुकीदरम्यान विविध गैरप्रकार ! सात गुन्हे दाखल, कुठे मारहाण तर कुठे पैसे वाटपाच्या घटना

Ahmednagar Crime

लोकसभेच्या नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी पैसे वाटपाच्याही तक्रारी करण्यात आल्या आहेत. या गैरप्रकारांबाबत विविध पोलीस ठाण्यांत एकूण ७ गुन्हे दाखल झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. १३) सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरु झाली. मतदानाची वेळ सायंकाळी ६ वाजे पर्यंत होती, मात्र अनेक ठिकाणी सायंकाळी मतदान केंद्रावर गर्दी झाल्याने रात्री उशिरा पर्यंत काही ठिकाणी मतदान सुरु होते. या प्रक्रीये दरम्यान अनेक ठिकाणी गैरप्रकार झाले.

– शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील मतदान केंद्रात मोबाईल न्यायला बंदी असतानाही एकाने या आदेशाचा भंग करत केंद्रात मोबाईल नेला व मतदान करतानाचा व्हिडीओ मोबाईल मध्ये काढल्याचा प्रकार सकाळी ९ वाजता घडला.

याबाबत मतदान केंद्रप्रमुख रामराव अनंता पवार यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून जावेद बालम पठाण (वय २९, रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) याच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३२ (१) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी येथील मतदान केंद्रात घुसून एकाने केंद्रप्रमुख व इतर कर्मचाऱ्यांवर तुम्ही पैसे घेवून एका विशिष्ट उमेदवाराचा प्रचार मतदान केंद्रात करत आहात, असा आरोप करून गोंधळ घातला व मतदान साहित्य उचलण्याचा प्रयत्न करत निवडणुकीच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.

लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल असे बोलून त्याचा व्हिडीओ काढुन सोशल मिडीयावर प्रसारित केला. त्यामुळे याबाबत मतदान केंद्रप्रमुख सतीश सूर्यभान काळे (रा. केडगाव, नगर) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून एका अनोळखी व्यक्तीवर भा.दं.वि. कलम १७१ (ग) (१), ५०५, १३१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची बदनामी करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निलेश लंके प्रतिष्ठान पाथर्डी या व्हॉट्सप ग्रुपमधील लोकनेते सोशल मीडिया नावाने असलेल्या एका मोबाईलनंबर धारक अनोळखी व्यक्तीविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– तुम्ही सुजय विखेंचा प्रचार का करताय असे म्हणत युवासेनेचे विक्रम राठोड व अन्य एका अनोळखी इसमाने एकाला शिवीगाळ करत हाताच्या चापटीने मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास स्टेट बँक चौकात छावणी कॉम्प्लेक्स मधील गाळ्या समोर घडली.

याबाबत अरुण परसराम डांगे (वय ४५, रा. कोऱ्हाळे ता. राहाता) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विक्रम राठोड व त्यांच्यासह एका अनोळखी इसमाविरुद्ध भा.दं. वि. कलम ३२३, ५०४, ५०६ (निवडणूक एन.सी.) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– मतदानासाठी आलेल्या मतदारांना मतदान केंद्रात जाण्यापूर्वीच थांबवून त्यांच्या हाताच्या बोटाला मतदान केंद्राबाहेरच शाई लावणाऱ्या एकाला महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पकडल्याची घटना सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास स्टेट बँक चौकात छावणी कॉम्प्लेक्समधील गाळ्यासमोर घडली.

अरुण परसराम डांगे (वय ४५, रा. कोऱ्हाळे ता. राहाता) असे या पकडलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्या विरुद्ध निवडणुकीच्या कामावर नियुक्त असलेले मंडल कृषी अधिकारी बाळाजी शहाजी सोनवणे (रा. कोल्हार ता. राहाता) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी अरुण डांगे याच्याविरुद्ध भा.दं. वि. कलम १७१ (फ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

– भाजपाचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांना मतदानाच्या एक दिवस अगोदर रविवारी (दि.१२) रात्री ९.३० च्या सुमारास पारनेर ते आळकुटी रस्त्यावर वडझिरे गावच्या शिवारात पैसे वाटताना निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी पकडले. त्यावेळी शिंदे यांनी माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी,

सचिन मच्छिंद्र वराळ यांच्यासह २० ते २२ अनोळखी लोकांना बोलावून शिवीगाळ करत लोखंडी रॉड, लोखंडी पाईप ने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद निलेश लंके यांचे चुलत भाचे अनिल दत्तात्रय गंधाक्ते (रा. वडझिरे, ता. पारनेर) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात दिली आहे.

या मारहाणीत फिर्यादी अनिल तसेच त्याला सोडवायला आलेले पांडुरंग बबनराव गंधाक्ते व वर्षा पांडुरंग गंधाक्ते हे जखमी झाले आहेत. या शिवाय ही मारहाण करतेवेळी वर्षा गंधाक्ते यांच्या गळ्यातील ४ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र सदर आरोपींनी तोडून नेल्याचेही फिर्यादीत म्हंटले आहे.

या फिर्यादी वरून राहुल प्रकाशराव शिंदे, विजय सदाशिव औटी, सचिन मच्छिंद्र वराळ यांच्या सह २० ते २२ अनोळखी इसमांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ३२७, ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– दरम्यान भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनीही फिर्याद दिली असून आपण आपल्या क्रेटा गाडीतून वाहन चालक शरद अंबादास सोमवंशी याच्या समवेत आळकुटी गावाकडे जात असताना वडझिरे गावच्या शिवारात १० जणांनी दुचाकी वाहनांवर आपला पाठलाग करून अडविले.

यातील अनिल गंधाक्ते याने पिस्तुलाचा धाक दाखवत दोघांना गाडीच्या खाली उतरवले, गाडीची मागील बाजूची काच फोडत तुम्ही पैसे वाटतात असा आरोप करत जीवे मारण्याची धमकी दिली. या गडबडीत कोणीतरी शिंदे यांच्या गळ्यातील ३ तोळे वजनाची सोन्याची चेन तोडून नेली असल्याचे फिर्यादी म्हंटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe