२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या पगाराचे काम पाहणाऱ्या वेतन व भविष्य निर्वाह विभागातील सहायक लेखा अधिकारी अशोक मनोहर शिंदे (वय ४९, रा. तुळसाई पार्कच्या पाठीमागे, गावडे मळा, पाईपलाईन रोड, सावेडी) हे ॲण्टी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत.
त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ८ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले.मंगळवारी (१८ फेब्रुवारी) या संदर्भातील कारवाई करण्यात आली. शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारदार हे माध्यमिक शिक्षक होते. ते ३ जून २०२२ रोजी सेवा निवृत्त झाले आहेत.परंतु तक्रारदार हे सेवानिवृत्त झाल्या पासून त्यांना प्रोव्हिडंड फंड आज अखेर मिळालेला नाही. त्याकरीता तक्रारदार हे जि.प.माध्यमिक शिक्षण विभाग या कार्यालयात काम करणारे सहायक लेखा अधिकारी अशोक शिंदे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन पाच सहा वेळेस समक्ष भेट घेतली.
त्यावेळी अशोक शिंदे तक्रारदार यास म्हणाले की, तुमचे काम खुप जुने असून ते करून देण्यासाठी बक्षीस म्हणून २० हजार रुपये द्यावे लागतील.या बाबतची तक्रार नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती.
त्यानुसार लाच मागणी पडताळणी करण्यात आली.लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान अशोक शिंदे यांनी तक्रारदार यांची प्रोव्हिडंड फंडची फाईल पास करण्यासाठी लाचेचा पहिला हप्ता पंचा समक्ष मागणी केली.
त्यामुळे मंगळवारी (१८ फेब्रुवारी) जि.प.माध्यमिक शिक्षण विभाग, अहिल्यानगर येथे सापळा रचला होता. तक्रारदार यांच्याकडून अशोक शिंदे यांनी पंचा समक्ष ८ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
ही कारवाई नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे, पो.कॉ. सचिन सुद्रुक, पो.कॉ. गजानन गायकवाड यांच्या पथकाने केली.