९ जानेवारी २०२५ श्रीगोंदा : तालुक्यातील कोळगाव फाटा परिसरात श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाची अँब्युलन्स आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
रंजना सुरेश पिपाडा वय ६० रा. श्रीगोंदा असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाची अँब्युलन्स क्र. एम. एच. १६ सी. डी. ०३५० ही डिलिव्हरीचे पेशंट श्रीगोंदा येथून नगर येथील सिव्हील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात होती

कोळगाव परिसरात कोथुळ चौकात मोहोरवाडी कडून ऊसतोडी मजूर घेऊन जात असलेला ट्रॅक्टर नगर दौंड रस्ता ओलांडत असताना अँब्युलन्स आणि ट्रॅक्टर ट्रॉली यांच्यात जोरदार भीषण धडक झाली.
या भीषण धडकेत अँब्युलन्स ड्रायवर महेश अंबिलवाले आणि सिस्टर अनिता छगन गंबरे यांच्यासह तीन ते चार जण गंभीर जखमी झाले.ट्रॅक्टर ट्रॉली मधील काही ऊस तोडणी कामगार किरकोळ जखमी झाले तर अँब्युलन्स मधील पेशंटचे नातेवाईक असलेल्या रंजना सुरेश पिपाडा वय ६० रा. श्रीगोंदा या अपघातात गंभीर जखमी झाल्या.
उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या बाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात खबर दाखल झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी हालचाल करत अपघातातील जखमींना कोळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले.