१० फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : अल्पवयीन मुलास पळवून नेऊन चोऱ्या करायला लावणे व चोऱ्या न केल्यास उपाशी ठेवून मारहाण करणारी महिला आरोपी येथील पोलिसांनी नुकतीच जेरबंद केली. राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील देवळाली प्रवरा येथून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याबाबत मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
सदर पीडित अल्पवयीन मुलाचा शोध घेत असताना, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून रेखा शरद पवार हिला ताब्यात घेऊन विचारपूस केली. तेव्हा तिने राहुरी पोलीस स्टेशन हद्दीसह अहिल्यानगर जिल्ह्यात मोटरसायकल चोऱ्या व इतर चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर महिलेस अटक करण्यात आली.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-52.jpg)
तिला विश्वासात घेऊन विचारपूस करता सदर मोटरसायकल व इतर चोऱ्या करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करत असल्याचे सांगून देवळाली येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलास चोऱ्या करायला लावत असल्याचे सांगितले.सदर पीडित अल्पवयीन मुलाची सुटका करून त्याला विचारपूस केली असता तो काही सांगत नव्हता. परंतु पोलिसांनी त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने सदर महिलेच्या सांगण्यावरून चोऱ्या करत असल्याची माहिती दिली.
चोऱ्या न केल्यास सदर महिला अल्पवयीन मुलास मारहाण करून उपाशीपोटी ठेवत होती. नातेवाईकाला सापडणार नाही, या उद्देशाने अज्ञातस्थळी डांबून ठेवल्याचे अल्पवयीन मुलाने सांगितले. तसेच तिच्याविषयी कोणी काही तक्रार केल्यास ती त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती.