Ahmednagar Crime : एका गावातील अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून २१ जून २०२३ रोजी पळवून नेल्याची तक्रार आश्वी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्यात तब्बल दोन महिने फरार असलेला आरोपी अजय नांगरे याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दोन महिन्यांपूर्वी आश्वी पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून २१ जून २०२३ रोजी पळवून नेल्याची तक्रार आश्वी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल ए. डी. शिंदे हे तपास करीत होते.

यावेळी पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना या गुह्यातील आरोपी अजय नागरे हा शिबलापूर-माळेवाडी शिवारातील ऊसाच्या शेतात लपून बसला असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली होती.
त्यामुळे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी तात्काळ पोलीस हेडकॉन्स्टेबल रविंद्र वाकचौरे, पोलीस नाईक विनोद गंभीरे, पोलीस नाईक हुसेन शेख, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल शांताराम झोडगे तसेच होमगार्ड सुशांत सांगळे यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर या पथकाने माळेवाडी-शिबलापुर शिवारातील ऊसाच्या शेतात लपून बसलेला आरोपी अजय सुभाष नागरे याला मंगळवारी (दि. १५) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष भंडारे करीत आहेत. तर आरोपीला काल बुधवारी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.













