अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- गेल्या चार पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे द्राक्षे, गहू, हरभरा, बोर, तसेच कांद्याच्या पिकांना याचे परिणाम दिसू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातादरण याचा मोठा फटका पिकांना बसतो आहे.
परिणामी उत्पादनात तर घट होणारच आहे पण पिकासाठी झालेला खर्चही काढावा कसा असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे. दरम्यान ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये द्राक्ष पिकांची छाटणी होते.

यातच काही ठिकाणी बागांमधील वेलीवर द्राक्षांचे घड दिसू लागले आहेत. काही बागांमध्ये चांगले घड दिसत आहेत. परंतु या ढगाळ वातावरणामुळे लगडलेले घड जिरतात, तसेच त्यांची बाळी तयार होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
बागांवर लहान लहान किटक दिसू लागल्याने किटकनाशक मारण्यावाचून शेतकर्यांकडे पर्याय नाही. किटकनाशके आणि बुरशीनाशकांचा खर्च वाढणार असल्याने मोठा अर्थिक फटका शेतकर्यांना बसणार आहे.
द्राक्षांचे घड जिरू नयेत म्हणून पोषक मारावे लागणार असल्याने तोही खर्च वाढणार आहे. तसेच राहाता तालुक्यात गहू पिकावर या वातावरणामुळे मावा पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उगवून आलेल्या हरभर्यावर अळीचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे. हरभर्याचे क्षेत्रही यावर्षी वाढले आहे. तालुक्यात कांद्याच्या लागवडी वाढल्या आहेत.
याशिवाय कांद्याची रोपे मोठ्या प्रमाणात असल्याने अशा वातावरणात या कांद्यांवर तसेच रोपांवर करप्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कांद्याच्या लागवडी सध्या तालुक्यात सुरू आहेत. यामुळे रोपांना तसेच कांद्याला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













