Mumbai Metro News : मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांमध्ये शासनाच्या विशेष प्रयत्नातून मेट्रो सुरू झाली आहे. यामुळे या महानगरांमधील नागरिकांचा प्रवास वेगवान झाला आहे. विशेष बाब अशी की या शहरांमधील मेट्रोचा विस्तार देखील जलद गतीने सुरू आहे.
अशातच आता मुंबईकरांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे ती म्हणजे आता गेट वे ऑफ इंडिया ते ठाण्यापर्यंत नवा मेट्रो मार्ग तयार होणार असून या मेट्रो मार्गावर एकूण 13 नवीन स्थानके विकसित केले जाणार आहेत, यामुळे ठाणेकरांचा मुंबईकडील प्रवास आणखी वेगवान होणार आहे.

कसा असणार नवा मेट्रो मार्ग ?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ठाण्यातील आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियादरम्यान नवा मेट्रो मार्ग विकसित केला जाणार आहे. हा मेट्रो मार्ग भुयारी राहणार आहे आणि हा मार्ग मेट्रो-11 म्हणून ओळखला जाईल.
महत्त्वाची बाब अशी की, या प्रस्तावित मेट्रो मार्गाचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. यामुळे ठाणे ते दक्षिण मुंबई दरम्यानचा प्रवास वेगवान आणि सुरक्षित होईल अशी आशा आहे. या मेट्रो मार्गाबाबत बोलायचं झालं तर हा मेट्रोमार्ग 17.51 किलोमीटर लांबीचा राहणार आहे.
या प्रस्तावित मेट्रो मार्गामुळे शीव, वडाळा, शिवडी, भायखळा, भेंडी बाजारसारखे परिसर सुद्धा मेट्रोच्या नकाशावर येणार आहेत आणि साहजिकच यामुळे या भागातील वाहतूक कोंडी देखील बऱ्यापैकी नियंत्रणात येणार असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त होतोय.
खरेतर, सध्या हा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लवकरच या प्रस्तावाला राज्याची मंजुरी मिळू शकते असे म्हटले जात आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.
किती स्थानके विकसित होणार ?
या मेट्रो मार्गावर एकूण तेरा स्थानक विकसित होणार आहेत. वडाळा, शिवडी, वाडी बंदर, रे रोडहून पश्चिमेकडे भायखळा, नागपाडा जंक्शन, भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट, सीएसएमटी, जीपीओ, हॉर्निमन सर्कल, गेट वे ऑफ इंडियाजवळ अपोलो बंदर ही या मार्गावरील स्थानके राहणार आहेत.
या मार्गावर एकूण तेरा स्थानके असतील पण यापैकी फक्त एकच स्थानक जमिनीवर राहणार आहे उर्वरित बारा स्थानके भुयारी राहतील. या मार्गांवरील आणिक डेपो वगळता सर्व 12 स्थानके भुयारी असतील.