मुंबईच्या समुद्रात उभारणार देशातील पहिलं ऑफशोअर विमानतळ ! काय आहे फडणवीसांचा मेगा प्लॅन?

महाराष्ट्रात खास करून मुंबईत विमानसेवा झपाट्याने वाढते आहे. नवीन विमानतळ, सुधारलेली धावपट्टी आणि सरकारी योजनांमुळे सर्वसामान्य माणसालाही आता विमानप्रवास सोपा होतो आहे.

Published on -

मुंबईकरांसाठी एक भन्नाट बातमी आहे लवकरच आपल्याला समुद्रावरच एक नवं, भारी विमानतळ मिळणार आहे! हे देशातलं पहिलंच ऑफशोअर (समुद्रात उभं राहिलेलं) विमानतळ असेल. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील हे तिसरं विमानतळ असणार असून, लवकरच त्याचं काम सुरू होणार असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल आहे.

मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये विमानतळांबाबत एक मोठा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात केंद्रीय नागरी हवाई मंत्री, इतर राज्यांचे मंत्री आणि अनेक मोठे अधिकारी होते. इथे बोलताना फडणवीस यांनी सांगितलं की भारत आता जगात झपाट्यानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि त्यासाठी मजबूत विमानसेवा ही गरज बनली आहे.

ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वीपर्यंत विमानसेवा म्हणजे फक्त केंद्र सरकारचा विषय होता. पण आता राज्य सरकारनाही याकडे लक्ष द्यावं लागतंय. कारण जे राज्य विमानसेवा आणि विमानतळांवर लक्ष देणार नाहीत, ती मागे पडतील. म्हणूनच महाराष्ट्रात सध्या २४ जिल्ह्यांमध्ये विमानतळ आहेत आणि लवकरच हे ३० जिल्ह्यांपर्यंत वाढवणार आहोत.

गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही विमानतळ उभारण्याचा विचार सुरू आहे. यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. गडचिरोलीमध्ये दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येत आहे आणि भविष्यात ती दहा लाख कोटींपर्यंत जाईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

नवी मुंबई विमानतळाचं कामही फडणवीसांनी उल्लेखलं. या विमानतळाचं काम खूप आधी सुरू झालं होतं, पण वेगवेगळ्या परवानग्यांमुळे ते रखडलं. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या परवानग्या एकदम मंजूर केल्या आणि त्यामुळे कामाला वेग आला. हे विमानतळ आणि अटल सेतू मिळून मुंबईच्या पुढच्या पिढीचं शहर घडवणार आहेत.

फडणवीस म्हणाले की, २०३० पर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवायचं आहे. यासाठी विमानतळ, उद्योग आणि मोठमोठ्या गुंतवणुकीची तयारी सुरू आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात एकटं १.५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभी राहू शकते.

केंद्रीय हवाई मंत्री के. राममोहन नायडू यांनी सांगितलं की, लवकरच ‘उडान यात्री कॅफे’ सुरू होणार आहे. हे एक खास ठिकाण असेल, जिथे सामान्य प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा असतील. केंद्र सरकारनं ‘उडान’ योजना सुरू केली आहे, ज्यामुळे सामान्य माणसालाही विमानप्रवास परवडतो आणि सोपं होतं.

नायडू यांनी सांगितलं की महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्यप्रदेशसारख्या राज्यांमध्ये वर्षभर चांगलं हवामान असतं, त्यामुळे इथे विमान सेवा वाढवण्यासाठी उत्तम संधी आहे. केंद्र सरकार राज्यांना मदत करतंय आणि नवीन विमानतळांमुळे आसपासच्या भागात विकासही वाढेल.

कार्यक्रमात मुरलीधर मोहोळ यांनीही सांगितलं की, केंद्र आणि राज्य मिळून विमान सेवा वाढवण्यासाठी काम करत आहेत. पश्चिम भारतात विमान वाहतूक अधिक चांगली आणि वेगवान करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!