अहिल्यानगरमधील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांची सरकारी अधिकारीपदी निवड

Published on -

अहिल्यानगर- विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या १२ विद्यार्थ्यांची विविध शासकीय विभागांत अधिकारीपदी निवड झाली. या यशामुळे महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा अधोरेखित झाला असून महाविद्यालयाच्या परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

महाविद्यालयास नॅशनल असेसमेंट ॲण्ड ॲक्रिडिटेशन कौन्सिल (नॅक) चे ए प्लस मानांकन प्राप्त असून स्थापत्य अभियांत्रिकी विभागास एनबीए नवी दिल्ली मान्यता प्राप्त आहे. या गुणवत्तेचा उत्तम प्रत्यय यंदाच्या शासकीय निवडीतून उमटला आहे.

अलिकडेच जाहीर झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, भूसंपदा विभाग व महानगरपालिका यासारख्या विविध शासकीय परीक्षांमधून या यशस्वी विद्यार्थ्यांची निवड झाली. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल स्थापत्य विभागप्रमुख डॉ. ऊर्मिला कवडे व विभागातील सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या यशाबद्दल महाविद्यालयासह संपूर्ण संस्थेमध्ये कौतुकाची लाट उसळली.

या यशाबद्दल विखे पाटील फाउंडेशनचे डायरेक्टर टेक्निकल प्रा. सुनील कल्हापुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र नवथर, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट अधिकारी प्रा. सुदर्शन दिवटे, विभागीय समन्वयक प्रा. आयन सेनगुप्ता व प्रा. अनिरुद्ध शिर्के यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे चेअरमन तथा जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, डायरेक्टर जनरल डॉ. पी. एम. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

स्थापत्य अभियांत्रिकीच्या या विद्यार्थ्यांची झाली निवड

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मयुरी बहाड (स्थापत्य अभियांत्रिकी सहायक जलसंपदा विभाग), साहिल फकीर (स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, सार्वजनिक बांधकाम विभाग), तसेच सहायक कार्यकारी अभियंता पदासाठी राहुल कासार, सागर वाडेकर, रुपाली भालेराव, मयूरी रासकर व मोहित बारगळ यांचा समावेश आहे. महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून समृद्धी थोरात, मयुरी जाधव व सौरभ बोरुडे यांची निवड झाली असून जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून प्रियांका पाटील यांची निवड झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!