महाराष्ट्रातील शाळा आता CBSE पॅटर्नवर, पाहा काय-काय बदलणार ?

CBSE पॅटर्नवर आधारित महाराष्ट्राचे नवे शालेय शिक्षण धोरण 2025 पासून लागू होणार आहे. यामध्ये अभ्यासक्रम, पुस्तके, परीक्षा पद्धतीत अनेक महत्वाचे मोठा बदल होणार आहे. या बदलांबाबत सविस्तर जाणून घेऊयात-

Published on -

CBSE Pattern | महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षणात मोठा बदल करत CBSE पॅटर्नवर आधारित नवे शैक्षणिक धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे धोरण 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने अंमलात आणले जाणार आहे. यामध्ये NCERT चा अभ्यासक्रम, बालभारतीकडून सुधारित पाठ्यपुस्तकांची निर्मिती, शिक्षकांचे प्रशिक्षण, परीक्षा पद्धतीतील बदल यांचा समावेश आहे.

या नव्या धोरणाअंतर्गत इयत्ता पहिलीपासून बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम चार टप्प्यांत लागू केला जाईल. 2025-26 मध्ये इ. 1 ली, 2026-27 मध्ये इ. 2 री, 3 री, 4 थी व 6 वी, 2027-28 मध्ये इ. 5 वी, 7 वी, 9 वी व 11 वी आणि 2028-29 मध्ये इ. 8 वी, 10 वी व 12 वी या इयत्तांमध्ये सुधारित अभ्यासक्रम लागू केला जाईल. राज्यातील पुस्तके बालभारती तयार करणार असून NCERT च्या पुस्तकांचा आधार घेत स्वतःचे अभ्यासक्रम तयार केले जातील. SCERT च्या माध्यमातून अभ्यासक्रमाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरु आहे.

मराठी भाषेचे काय ?

तसेच राज्य मंडळ कायम राहणार असून इ.10 वी आणि इ.12 वीच्या परीक्षा पूर्वीप्रमाणेच राज्य मंडळच घेणार आहे. त्यामुळे पालकांना त्यांच्या मुलांसाठी कोणता बोर्ड निवडावा, याचा निर्णय स्वेच्छेने घेता येणार आहे. कोणतेही बंधन राहणार नाही. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक व सामाजिक वारशाचे महत्व नव्या अभ्यासक्रमात कायम ठेवण्यात आले आहे. मराठी भाषा विषयाचे अध्यापन सर्व शाळांमध्ये अनिवार्य करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेचा अभिमान वाटावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.

शाळांचे वेळापत्रक

शाळांचे वेळापत्रक सध्याच्या हवामान व भौगोलिक परिस्थितीनुसारच ठरवले जाईल. स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार असून, मुलींना बारावीपर्यंत शिक्षण मोफत असेल.नव्या धोरणात शिक्षकांच्या भूमिकेला विशेष महत्त्व देण्यात आले असून, त्यांच्यासाठी ब्रिज कोर्स व विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जातील.

CBSE पॅटर्न मुळे काय होणार ?

CBSE पॅटर्ननुसार परीक्षा पद्धतीमध्ये संकल्पनांवर भर, सतत व सर्वसमावेशक मूल्यमापन, स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी अभ्यासक्रम, सॉफ्ट स्किल्स व समुपदेशन यांचा समावेश असेल. यामुळे विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाची संधी मिळणार आहे. या संपूर्ण शिक्षण धोरणामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल, त्यांच्यातील कौशल्यांचा विकास होईल आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये ते आत्मविश्वासाने सहभागी होऊ शकतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe