स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! एमपीएससी’ मुख्य परीक्षा पुढे ढकलली जाणार?

‘एसईबीसी’ प्रवर्गातील ३१८ नवीन उमेदवारांना संधी दिल्यानंतर एमपीएससी मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. २६-२८ एप्रिलच्या परीक्षेसंदर्भात निर्णय सोमवार किंवा मंगळवारी आयोगाच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

Published on -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेतील एसईबीसी (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग) प्रवर्गाच्या अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे आणि त्यासोबतच मराठा आरक्षण लागू झाल्याने अनेक उमेदवार गोंधळात सापडले.

या पार्श्वभूमीवर आयोगाने सुधारित निकाल जाहीर करून नव्याने ३१८ उमेदवारांना मुख्य परीक्षेची संधी दिली आहे. यामुळे आता ही २६ ते २८ एप्रिल दरम्यान होणारी मुख्य परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

आरक्षणातील बदलामुळे उमेदवारांची अडचण

डिसेंबर २०२३ मध्ये परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्यात मराठा समाजासाठी एसईबीसी आरक्षण लागू झाले. परिणामी अनेक उमेदवारांनी पूर्वी ‘खुला’ किंवा ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातून केलेला अर्ज ‘एसईबीसी’मध्ये बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्राच्या अटीबाबत माहिती दिली नसल्यामुळे अनेकांचे अर्ज अमान्य ठरले आणि त्यांचे मूळ ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातील अर्जच वैध राहिले.

कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी आयोगाचा निर्णय

न्यायालयीन निर्णयांच्या आधारे, एकदा पहिल्या टप्प्यात अर्ज वैध ठरल्यास पुढे आरक्षण बदलणे कायदेशीरदृष्ट्या शक्य नसते. त्यामुळे आयोगाने ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गाचे नुकसान टाळण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून ३१८ नव्या उमेदवारांना संधी देणारा सुधारित निकाल प्रकाशित केला.

लवकरच अंतिम निर्णय जाहीर होणार

या नव्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी फारच कमी वेळ मिळत असल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची जोरदार मागणी सुरू आहे. आयोगाकडून या मागणीची दखल घेण्यात आली असून, लवकरच एक निर्णय घेण्यात येणार आहे. सर्व सदस्यांची बैठक घेऊन सोमवार किंवा मंगळवारपर्यंत अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

तयारीसाठी भेटणार वेळ

या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्य परीक्षेच्या नवीन तारखांची प्रतीक्षा उमेदवारांना लागली आहे. परीक्षेचा कालावधी वाढवला गेला तर नव्याने पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना तयारीसाठी दिलासा मिळेल, तसेच परीक्षेच्या संधीचा न्याय्य उपयोग करता येईल. आता सर्वांचे लक्ष आयोगाच्या अधिकृत निर्णयाकडे लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News