Maharashtra HSC Result | राज्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 12वीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण केले असून 10वीच्या तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे या वर्षी दोन्ही वर्गांचे निकाल अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.
12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत पार पडली. दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. परीक्षा लवकर झाल्यामुळे निकालही वेळेत लागावा, यासाठी मंडळाने नियोजन केले आहे. सध्याच्या घडामोडींनुसार, 15 मे 2025 पर्यंत निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण-
छत्रपती संभाजीनगर विभागात पाच जिल्ह्यांमध्ये एकूण 460 परीक्षा केंद्रांवर 12वीची परीक्षा झाली. या विभागातून एकूण 1,85,330 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर लातूर विभागातील तीन जिल्ह्यांतील 249 केंद्रांवर 95,697 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा संपल्यानंतर लगेचच उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकांकडे देण्यात आल्या.
उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन वेळेत व्हावे म्हणून मंडळाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. तपासलेल्या उत्तरपत्रिका 8 एप्रिलपर्यंत बोर्डाकडे जमा करण्याची अंतिम मुदत होती आणि ती पूर्ण झाल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले.
कॉपीप्रकरणातील सुनावणी-
दरम्यान, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगरात यंदा काही कॉपीप्रकरणेही घडली होती. या प्रकरणांत संबंधित विद्यार्थ्यांची सुनावणी घेण्यात आली असून मंडळाच्या समितीने प्रकरणनिहाय निर्णय घेतले आहेत.
दरम्यान, शिक्षकांनी मूल्यांकन वेळेत पूर्ण केले असून 10वीच्या उत्तरपत्रिकांचे कामही लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. 12वीचा निकाल लवकर लागणार असून संबंधित सूचना मंडळाकडून लवकरच जाहीर केल्या जातील.
या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थी व पालकांनी निकालासाठी अधिक काळ वाट पाहण्याची गरज राहणार नाही. 15 मेपूर्वीच दोन्ही निकाल जाहीर होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.