महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील अंगणवाड्या आणि विविध माध्यमांच्या शाळांच्या कामकाजात सुसंगती आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने जिओ टॅगिंगद्वारे माहिती संकलनाचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. यानुसार, सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना त्यांच्या भौतिक सुविधांसह छायाचित्रे आणि संबंधित माहिती ३० एप्रिल २०२५ पर्यंत ‘महास्कूल जीआयएस’ या मोबाईल अॅपवर नोंदवणे बंधनकारक आहे. या माहितीची सत्यता तपासण्याची जबाबदारी शिक्षण अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
माहिती संकलनाचे काम सुरू
राज्यातील शाळांबाबतची सर्वसमावेशक माहिती केंद्र सरकारच्या युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन (यूडीस प्लस) पोर्टलवर उपलब्ध आहे. यामध्ये विद्यार्थी संख्या, शिक्षक संख्या, शाळांमधील भौतिक आणि संगणकीय सुविधा यांचा समावेश आहे. ही माहिती शैक्षणिक धोरणांची रचना, नियोजन आणि अंमलबजावणीसाठी वापरली जाते.

तथापि, गावे, वाड्या, वस्त्यांचे स्थान, लोकसंख्येची घनता, शाळांमधील अंतर, जवळील रस्ते, महामार्ग आणि इतर शासकीय सुविधा याबाबतची तपशीलवार माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध नव्हती. ही कमतरता दूर करण्यासाठी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर (MRSAC) सोबत करार करून शाळांचे जिओ टॅगिंग आणि माहिती संकलनाचे काम हाती घेण्यात आले आहे.
माहिती अपलोड करण्याच्या सूचना
‘महास्कूल जीआयएस’ हे विशेष अॅप शाळांच्या भौगोलिक माहितीचे संकलन आणि एकत्रीकरणासाठी विकसित करण्यात आले आहे. या अॅपद्वारे शाळांचे नाव, इमारत, स्वयंपाकघर, स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांचे छायाचित्रांसह तपशील नोंदवणे आवश्यक आहे. मुख्याध्यापकांना शाळेच्या आवारात उपस्थित राहून ही माहिती अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शाळांना त्यांचा यूडीस कोड किंवा यूडीस प्लसवर नोंदवलेला मोबाइल क्रमांक वापरून अॅपमध्ये लॉगिन करावे लागेल. यानंतर, यूडीस प्लसवरील माहिती अॅपमध्ये दिसेल, आणि मुख्याध्यापकांना पाच छायाचित्रे, शाळेची इमारत, स्वयंपाकघर, मुला-मुलींचे स्वच्छतागृह आणि पाण्याची सुविधा अपलोड करावी लागतील. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शाळांना ३० एप्रिल २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
शाळेची माहिती एकाच क्लिकवर
या उपक्रमामुळे शाळांच्या भौगोलिक स्थानाची अचूक माहिती, त्यांच्यामधील अंतर आणि उपलब्ध सुविधांचा तपशील एकाच व्यासपीठावर उपलब्ध होईल. यासाठी स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करण्यात येत आहे, ज्यामुळे शैक्षणिक नियोजन आणि धोरण आखणी सुलभ होईल. MRSAC च्या सहकार्याने शालेय शिक्षण विभागातील सर्व शाळांचे भौतिक स्थान छायाचित्रांसह जिओ टॅगिंगद्वारे नोंदवले जाईल.
शाळांशी संबंधित सर्व माहिती एकत्रितपणे ‘महास्कूल जीआयएस’ अॅपवर उपलब्ध होईल. ही माहिती शैक्षणिक सुधारणा, पायाभूत सुविधांचे नियोजन आणि संसाधनांचे वितरण यासाठी महत्त्वाची ठरेल.या जिओ टॅगिंग प्रक्रियेमुळे राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार आहे.