करंजी- विद्यार्थी घडवता येत नसतील तर शिक्षकांनी कारवाईची वाट न बघता बाजूला व्हावे. कामचुकारपणा करणाऱ्या शिक्षकांची गय केली जाणार नाही, अशा शब्दांत श्री नवनाथ विद्यालयाचे प्राचार्य संजय म्हस्के यांनी शिक्षण क्षेत्रात काम चुकारपणा करणाऱ्या शिक्षकांना खडे बोल सुनावले तर चांगले काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर थापही मारली आहे.
मंगळवारी श्री नवनाथ विद्यालयात पालक शिक्षक मेळावा पार पडला. या वेळी जेष्ठनेते अरुणराव आठरे, सरपंच रफिक शेख, माजी सरपंच सुनील साखरे, राजेंद्र क्षेत्रे, विलास टेमकर, सचिन शिंदे, शिक्षक नेते संतोष अकोलकर, माजी शिक्षक विठ्ठल टेमकर, देविदास शिंदे, उपसरपंच गणेश अकोलकर, माजी चेअरमन महादेव नजण, दत्तात्रय कारखेले, बाळासाहेब टेमकर, यांच्यासह पालक महिला उपस्थित होते. नवनाथ विद्यालयामध्ये महिला शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, विद्यार्थ्यांवरील आदरपूर्वक धाक कमी झाला आहे.

पालकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत महिला शिक्षकांची संख्या मर्यादित ठेवण्याची मागणी केली. तर मुला मुलींच्या स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्याच्या सूचना काही पालकांनी केल्या. तर शिक्षकांप्रमाणेच पालकांनीही जागृत राहण्याची गरज असल्याचे सुचवण्यात आले. अभ्यासाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन प्राचार्य म्हस्के यांनी या वेळी केले. या वेळी ‘लाईट ऑफ लाईट’च्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.