९ जानेवारी २०२५ नाशिक: विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या १५७ उमेदवारांनी निकालावर आक्षेप घेत उच्च न्यायालयासह विविध खंडपीठांमध्ये याचिका दाखल केल्या आहेत.यात सर्वाधिक ७५ याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या असून त्याखालोखाल ४५ याचिका नागपूर खंडपीठात, तर ३५ याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत लाभले.भाजपसह शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे सरकार सत्तारूढ झाले आहे.मात्र, महायुतीला निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेमुळे बहुमत मिळाल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

मतदार याद्यांमधील घोळ, निवडणुकीबाबतची कागदपत्रे व सीसीटीव्ही फुटेज देण्यास निवडणूक आयोगाचा नकार, अपारदर्शकता, धार्मिक प्रचार, मतदारांना आमिष, पैसेवाटप, ईव्हीएमचा गैरवापर आदी मुद्द्यांचा याचिकांमध्ये समावेश आहे.
मंबई उच्य न्यायालयात महाविकास आघाडीच्या सर्वाधिक उमेदवारांनी निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत. या उमेदवारांमध्ये प्रशांत जगताप (हडपसर पुणे), महेश कोठे (सोलापूर शहर उत्तर), अजित गव्हाणे (भोसरी पुणे), नरेश मणेरा (ओवळा मज्जीवाडा), सुनील भुसारा (विक्रमगड पालघर), मनोहर मढवी (ऐरोली ठाणे), राहुल कलाटे (पिंपरी- चिंचवड) आदी उमेदवारांचा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात तीन मतदारसंघांत ईव्हीएम सीलबंद
कळवण-सुरगाणा मतदारसंघातील माकपचे उमेदवार जे. पी. गावित यांच्यासह मालेगाव बाह्य मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बंडु काका बच्छाव व मालेगावचे शेख आसिफ शेख रशिद यांनी न्यायालयामध्ये निवडणूक निकालाला आव्हान दिले आहे.त्यामुळे या मतदारसंघांतील ईव्हीएम सीलबंद ठेवण्यात आल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली.