लोकसभेपूर्वीच अजित पवार यांना मोठा फटका, ‘हा’ जवळचा आमदार शरद पवार यांच्या गटात जाणार ! नगर दक्षिण मध्ये मोठी उलथापालथ

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar Loksabha Election

Ahmednagar Loksabha Election : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अठराव्या लोकसभेसाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केव्हाही निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या जाऊ शकतात. यामुळे सध्या संपूर्ण देशभर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असल्याचे पाहायला मिळत आहे.

आपल्या महाराष्ट्रात मात्र राजकीय वातावरण अधिक ढवळून निघाले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी उमेदवारांची नावे फायनल करून त्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. बीजेपी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली आहे.

मात्र, महाराष्ट्रात अजून एकाही पार्टीने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नाहीत. यावरून महायुती आणि महाविकासआघाडी या दोन्ही गटात आगामी निवडणुकांसाठी जागा वाटपावरून गदारोळ सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र असे असले तरी आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे.

अशा परिस्थितीत आता महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या अजित दादा यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित दादा यांच्या गटातील नगर जिल्ह्यातील एक विश्वासू आमदार आता पुन्हा एकदा शरद पवार यांच्या गटात सामील होणार आहे.

शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अधिकृत रित्या अजितदादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात समाविष्ट होणार अशी माहिती दिली आहे. खरेतर गेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या गटात सामील होतील अशा चर्चा होत्या.

निलेश लंके यांना नगर दक्षिण मधून लोकसभा निवडणूक लढवायची आहे आणि यासाठी महायुती मधून त्यांना तिकीट मिळणे जवळपास अशक्य होते. यामुळे ते लवकरच शरद पवार यांच्या गटात जातील अशी चर्चा होत्या. मध्यंतरी निलेश लंके यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या अभिनयाने सजलेले शिवपुत्र संभाजी हे महानाट्य नगर शहरात आयोजित केले होते. त्यावेळी महाविकास आघाडी मधील अनेक नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

या कार्यक्रमाला शरद पवार यांच्या गटातील अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या गटातील अनेक पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना पुन्हा एकदा शरद पवार गटात माघारी परतण्याचे आवाहन केले होते.

लोकनेत्यांनी हाती तुतारी घ्यावी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानीसाठी दिल्लीच्या तक्त्याला घाम फोडणाऱ्या अशा लोकनेत्याने हाती तुतारी घेऊन आता संसदेत यावं, अशी ऑफर अमोल कोल्हे यांनी दिली होती. तसे याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, अमोल कोल्हे यांनी दिलेल्या या ऑफरनंतर आता निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या गटात सामील होण्याचे ठरवले आहे.

आज, सोमवारी 11 मार्च 2024 ला निलेश लंके यांचा शरद पवार यांच्या गटात प्रवेश होणार आहे. शरद पवार देखील यावेळी उपस्थित राहणार अशी माहिती आहे. विशेष म्हणजे यावेळी लंके कुटुंबीय देखील हजेरी लावणार आहेत. एकदा की, निलेश लंके यांचा शरद पवार यांच्या गटात प्रवेश झाला की त्यांना महाविकास आघाडीमधून शरद पवार यांच्या गटाकडून अधिकृत उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान हा पक्षप्रवेश अजित पवार यांच्या गटाला मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभेपूर्वी अजितदादांची अहमदनगर जिल्ह्यातील ताकत आता कमी होणार आहे. यामुळे आता नगर दक्षिण मधून विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे आणि निलेश लंके यांची लढत पाहायला मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe