अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यात खळबळ ! नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित संस्थांवर मोठी कारवाई, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीचा थरार आत्ताच संपला आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित एनडीएने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली असून केंद्रात सत्ता स्थापित केली आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मोठा फटका बसला असून यावेळी त्यांच्या खासदारांचे संख्याबळ यासंबंधीत राज्यांमध्ये कमी झाले आहे. तथापि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने एनडीएच्या आपल्या सहकारी पक्षांच्या मदतीने सरकार स्थापित केले आहे.

दुसरीकडे लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. तत्पूर्वी विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. अशातच आता नाशिक शिक्षक मतदार संघातून एक मोठी बातमी हाती आली आहे. ही बातमी नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केलेल्या विवेक कोल्हे यांच्या संदर्भात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार युवा नेते कोल्हे यांच्याशी संबंधित असलेल्या अनेक संस्थांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. खरे तर या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अर्थातच 12 जून 2024 हा शेवटचा दिवस होता. यानुसार आज या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरलेल्या काही उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.

यामध्ये महायुतीकडून उभे असणारे शिंदे गटाचे किशोर दराडे यांच्याशी नाम सामर्थ्य असणाऱ्या किशोर दराडे नामक व्यक्तीने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी कडून उभे असणारे ठाकरे गटाचे संदीप गोपाळराव गुळवे यांच्याशी नाम सामर्थ्य असणारे संदीप नामदेव गुळवे यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना नक्कीच दिलासा मिळाला आहे. परंतु महाविकास आघाडीला आणि महायुतीच्या उमेदवारांना अपक्ष उभे राहिलेल्या विवेक कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही.

म्हणजेच अपक्ष उमेदवार कोल्हे यांच्या आव्हानांचा महायुतीला आणि महाविकास आघाडीला सामना करावा लागणार आहे. अशातच आता युवा नेते विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित असणाऱ्या संस्थांवर कारवाई केली जात असल्याची खळबळ जनक बातमी समोर आली आहे.

ऐन निवडणुकीच्या कालावधीतच विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित असणाऱ्या संस्थांवर कारवाई केली जात असल्याने नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात याची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. अपक्ष उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला नाही म्हणून तर ही कारवाई होत नाही ना असा प्रश्न देखील आता राजकीय वर्तुळात चर्चेला आला आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोल्हे यांच्यावर ही कारवाई होत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित असणाऱ्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि पुणे येथील संस्थांवर तपास यंत्रणांच्या माध्यमातून धाडी टाकल्या गेल्या आहेत.

आश्चर्याची बाब म्हणजे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याची देखील चौकशी सुरू झाली आहे. यामुळे अहमदनगर सह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ माजली आहे. अपक्ष उमेदवारी मागे घेण्यासाठी युवानेते विवेक कोल्हे यांच्यावर सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून दबाव टाकण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

एकंदरीत नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक अगदी सुरुवातीपासूनच चूरशीची बनली आहे. या कारवाईमुळे तर या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष राहणार आहे. युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी निवडणूक अधिक कठीण होऊन बसली आहे एवढे नक्कीच.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe