Ahmednagar Politics : जिल्ह्यातील अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोठे परिवर्तन झाले आहे. दोन्ही जागा महाविकास आघाडीने निर्विवाद जिंकल्या. अहमदनगरमधून नीलेश लंके, तर शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले.
मागील निवडणुकीत मिळवलेली सत्ता महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना गमावण्याची वेळ आली. जनतेशी थेट संवाद नसल्याने दोन्ही उमेदवारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखविला असे सध्या म्हटले जात आहे.
दरम्यान चुरशीची लढत झाली होती दक्षिणेत. निकालाची मतमोजणी सुरु झाली तेव्हाही विखे की लंके अशीच धाकधूक शेवटपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसली. अखेर जळपास ३० हजारांच्या फरकाने विजय लंके विजयी झाले.
लाल हिरव्या गुलालाची चर्चा
नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे विजयी झाल्यानंतर अहमदनगर दक्षिणेत विविध ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. सर्वच मतदार संघामध्ये विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान सध्या लाल हिरव्या गुलालाची चर्चा रंगली आहे.
डॉ. सुजय विखे यांचा पराभव करून नीलेश लंके यांनी बाजी मारल्याने राहुरीतील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्याची आतषबाजीने जल्लोष केला. या जल्लोषात लाल बरोबरच हिरवा गुलालही उधळण्यात आल्याने राहुरीकरांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला.
समतेचा संदेश
दरम्यान लाल हिरवा गुलाल एकत्रित उधळा गेला असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. यामधून एकतेची शिकवण मिळत असल्याची चर्चा अनेकांनी केली. तर काहींनी विविध तर्कवितर्क लढवण्यास सुरवात केली होती.
विखे यांचे फुटीमुळे घटले मताधिक्य
राहुरीत विखे यांना मानणारा मोठा गट असला तरी यंदाच्या निवडणुकीत या गटात पडलेली फूट विखेंचे मताधिक्य घटण्यास कारणीभूत ठरली. विखेंची राहुरीत कोंडाळे करून असलेल्या ठराविक यंत्रणेचा आत्मविश्वास निवडणुकीत नडला.