Ahmednagar Politics : अहमदनगरमधील दिग्गज घुले, नागवडे विखेंचेच काम करणार, पण मनात दाटली ‘ही’ मोठी भीती..

Ahmednagarlive24 office
Published:
radhakrusn vikhe

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर लोकसभेची निवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे. एकीकडे महायुती व दुसरीकडे महाविकास आघाडी. महायुतीमध्ये सध्या आजवर एकमेकांच्या विरोधात बसलेले, एकमेकांच्या विरोधात काम केलेले एकाच मंचावर दिसू लागले आहेत.

दरम्यान अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये असल्याने अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे दिग्गज आता खा. सुजय विखे यांचे काम करताना दिसतील. दरम्यान त्या संदर्भात राष्ट्रवादीचा मेळावा देखील काल (४ एप्रिल) पार पडला. यामध्ये राष्ट्रवादीचे दिग्गज नेते चंद्रशेखर घुले व राजेंद्र नागवडे आदींची हजेरी होती. यावेळी त्यांनी विखे यांचे काम करणार असल्याचे जाहीर केले असले तरी त्यांनी तेथे एक भीतीही व्यक्त केली आहे. त्यांच्या मनात असणारी एक शंकारूपी भीती त्यांनी यावेळी बोलून दाखवी.

आम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करणार आहोत. मात्र, आम्ही केलेल्या कामाची पावती आम्हालाच मिळेल का, अशी शंका माजी आमदार व अजित पवार गटातील नेते चंद्रशेखर घुले व राजेंद्र नागवडे यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासमोर उपस्थित केली.

महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा केडगाव येथे झाला. यावेळी घुले, नागवडे हे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत व्यासपीठावर होते. घुले म्हणाले, यापूर्वीच्या निवडणुकांत आम्ही दिवंगत दादा पाटील शेळके, तुकाराम गडाख, शिवाजी कर्डिले, राजीव राजळे आणि संग्राम जगताप यांचे काम प्रामाणिकपणे केले. आता तुमचेही काम करू. अट फक्त एकच आहे.

आमच्या कामाचे बिल आमच्याच नावावर फाडा. नागवडे यांनीही घुले यांच्या भाषणाला दुजोरा देत हीच मागणी केली. शेवगाव-पाथर्डीत मोनिका राजळे आमदार आहेत. तर श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते आमदार आहेत. त्यामुळे महायुतीत नेमके श्रेय कोणाला मिळणार? यावरुन घुले, नागवडे यांनी हे विधान केल्याचे मानले जाते.

मेळाव्याला डॉ. सुजय विखे-पाटील, आमदार संग्राम जगताप, पवार गटाचे प्रदेश सचिव सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, कार्याध्यक्ष संजय कोळगे, अनुराधा नागवडे, सुनील उमाप, विक्रम कळमकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री विखेंकडून खा.सुजय विखेंना सबुरीचा सल्ला
राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, समोरच्या उमेदवाराकडे सांगण्यासाठी काही नाही. म्हणून ते ही निवडणूक नकारात्मकतेकडे घेऊन जात आहेत. त्याला आपण बळी पडतो आहोत. मी डॉ. सुजय यांना सांगितले आहे की, समोरच्या उमेदवाराला काहीही बोलू द्या, त्यावर बोलू नका, आपले काम डोंगराएवढे आहे, त्यावर बोला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe