Ahmednagar Politics : महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदार संघ असून त्यात अहमदनगर हा एक राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण मतदारसंघ मानला जातो. शैक्षणिक असो, धार्मिक असो की ऐतीहासीक असो सर्वच क्षेत्रात अहमदनगर जिल्हा एक वेगळ्याच्या उंचीवर पाहायला मिळतो. त्यामुळे येथील राजकारणही असेच चर्चेत असते. वरिष्ठांची कायम अहमदनगर जिल्ह्यावर नजर असते.
आता लोकसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर व शिर्डी असे दोन मतदार संघ आहे. त्यातील अहमदनगर लोकसभा मतदार संघाचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल तब्बल 46 वर्षे येथे काँग्रेसचे वर्चस्व होते. 1952 ते 1996 या काळात येथे काँग्रेसचेच उमेदवार निवडून येत होते. 1998 मध्ये काँग्रेसचा विजय रथ थांबला.
1998 मध्ये दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांनी येथे शिवसेनेकडून निवडणूक लढवली व ते विजयी झाले. त्यानंतर आजवर या मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेच नाहीत. पुन्हा एकदा काँग्रेस या जागेवर आपले गमावलेले वर्चस्व मिळवण्यासाठी धडपडत आहे. त्याचवेळी या जागेवर आपला विजय कायम ठेवण्यासाठी भाजप लढत आहे.
46 वर्षे काँग्रेसचे राज्य ते आता भाजपचे प्राबल्य…असा आहे अहमदनगर लोकसभेचा इतिहास
अहमदनगर लोकसभा मतदारसंघावर तब्बल 46 वर्षे काँग्रेसचेच राज्य राहिले. 1952 ते 1996 पर्यंत काँग्रेसचेच उमेदवार येथे निवडून आले. 1952 मध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत उत्तमचंद आर बोगावत हे काँग्रेचे उमेदवार खासदार झाले. त्यानंतर 1957 मध्ये आर.के.खाडिलकर हे खासदार झाले.
1962 मध्ये मोतीलाल फिरोदिया, 1967 मध्ये अनंतराव पाटील, 1971 व 1977 मध्ये अण्णासाहेब शिंदे काँग्रेससह खासदार झाले. त्यानंतर यशवंतराव गडाख पाटील यांनी गड राखला. 1984, 1989 आणि 1991 असे सलग तीन वेळा ते खासदार झाले.
1994 मध्ये या जागेवर पोटनिवडणूक झाली व यात काँग्रेसचे मारुती देवराम शेळके अर्थात दादापाटील शेळके विजय झाले. 1996 च्या निवडणुकीतही जनतेने त्यांना निवडून दिले. येथपर्यंत तब्बल 46 वर्षे काँग्रेसचा गड अबाधित राहिला.
दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांनी रोखला विजयरथ
1998 मध्ये दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांनी शिवसेनेकडून उमेदवारी लढत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून काँग्रेसचा विजय रथ रोखला. त्यानंतर आजवर येथे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले नाहीत. 1999 मध्ये झालेल्या निवडणुकीत ही जागा भाजपच्या खात्यात गेली.
निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे दिलीपकुमार गांधी खासदार झाले. 2004 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकाराम गडाख विजयी झाले. त्यानंतर ही जागा भाजपने काबीज करत 2009 व 2014 मध्ये भाजपचे दिलीपकुमार गांधी खासदार झाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुजय विखे पाटील हे विजयी झाले.
विधानसभा मतदार संघात काय स्थिती?
अहमदनगर लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे असला तरी या भागातील ६ विधानसभा जागा असून त्यातील २ विधानसभा मतदार संघावर भाजपचे वर्चस्व आहे. उर्वरित ४ वर राष्ट्रवादी काँग्रेसचे नियंत्रण आहे.
यात शेवगाव आणि श्रीगोंदा विधानसभेवर भाजप तर राहुरी, पारनेर, कर्जत जामखेड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व अहमदनगर शहरमध्ये अजित पवार गटाचे आमदार आहेत.