Ahmednagar Politics : अहमदनगर मध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. जिल्ह्यातील नगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे हे पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
महायुती मधून ही जागा भाजपाच्या वाट्याला जाते आणि येथून भाजपाचा उमेदवार उभा राहणार अशी शक्यता आहे. भाजपाकडून अजून या जागेवर कोणाला अधिकृत उमेदवारी मिळणार हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र सुजय विखे हे या यादीत प्रबळ दावेदार आहेत.
दुसरीकडे महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या अजितदादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी सुद्धा या जागेवरून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी ते शरद पवार यांच्या गटात समाविष्ट होतील अशा देखील चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत.
यामुळे विखे विरुद्ध लंके असे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता विखे आणि लंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्या असल्याची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावेडी उपनगरातील बंधन लॉन या ठिकाणी एका खाजगी वृत्त वाहिनीच्या टॉक शो मध्ये विखे आणि लंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे.
विखे आणि लंके यांचे समर्थक या कार्यक्रमावेळी भिडले आहेत. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमामध्ये गुंडगिरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. डॉ. सुजय विखे यांचे बॅनर हातामध्ये घेऊन भाजपाच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला.
महिला भगिनींना सुद्धा धक्काबुक्की केली असल्याचा मोठा गंभीर आरोप केला आहे. तसेच यावेळी काळे यांनी जे महिलांचा सन्मान करू शकत नाहीत, गुंडगिरी करतात त्यांना लोकशाही मान्य नाही, असे म्हणतं या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे प्रसार माध्यमांना देखील यामध्ये टार्गेट केल गेलं असल्याने प्रसार माध्यमांची आशा पद्धतीनं गळचेपी करणे आम्हाला मान्य नसून आम्ही याचा निषेध करत असल्याचे यावेळी काळे यांनी म्हटले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या कार्यक्रमाला महायुती तसेच महाविकास आघाडी मधील अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा मोर्चा संघटनेचे प्रतिनिधी देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. मात्र हा कार्यक्रम सुरू झाला आणि अवघ्या पाच मिनिटातच या कार्यक्रमात मोठा वाद पाहायला मिळाला. काँग्रेसने या गदारोळावरून भाजपाला लक्ष केले आहे. काँग्रेसचे किरण काळे यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत महाराष्ट्राचा बिहार झाला असल्याचा घनाघात केला आहे.
शरद पवार यांच्या गटातील तालुका अध्यक्ष सुवर्णा धाडगे यांनी देखील यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. धाडगे यांनी या कार्यक्रमात महिलांना बोलू दिले गेले नाही. महिलांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तर त्यांना देता आली नाही. त्यांची भांबेरी उडाली. भाजपच्या गुंड कार्यकर्त्यांनी धुडगूस घालायला सुरुवात केली.
महिलांचा सन्मान न ठेवणे ही यांची संस्कृती असल्याचा घनाघात केला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या सायली चेडे यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी, मी महिलांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी मला सुद्धा बोलू दिले गेले नाही. भाजपच्या गुंड कार्यकर्त्यांनी मला धक्काबुक्की केली, अस म्हणतं या घटनेचा निषेध केला आहे.